Ahmednagar Politics : कोरोनाच्या काळात आ. लंके यांनी उत्तम काम केलं. या कामाने ते देशभर प्रसिद्ध झाले. लोकांशी थेट कनेक्शन, आपुलकीचा हात व थेट मदत करण्याची भावना यामुळे ते जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे याचाच फायदा घेत विखे यांना शह देण्यासाठी शरद पवार यांनी मोठी खेळी आखली होती.
आ. लंके यांना पाठबळ देत लोकसभेला उभं करायचं व विखे यांना शह द्यायचा असं ते नियोजन होत. त्या अनुशंघाने त्यांनी लंके याना प्रमोट देखील केलं होत. शरद पवार 2 ऑक्टोबर 2021 रोजी निलेश लंके यांच्या घरी गेले होते.
तेथूनच त्यांची राजकीय हवा वाढली होती. आता लंके हे अजित दादा गटात आहेत. व अजित दादा भाजपसोबत आहेत. त्यामुळे हा वाद थांबेल असे वाटत होते. परंतु शरद पवारांच्याच पावलावर पाऊल टाकत अजित पवारांनी तोच कित्ता पुन्हा गिरवल्याचं आज पारनेरात दिसलं.
लंके यांनी आयोजित केलेल्या मोहटा देवी यात्रेचा प्रारंभ अजित पवार यांनी आज पारनेरमध्ये येऊन केला. यावेळी त्यांनी चिक्कार घोषणांचा पाऊस पडत लंके यांची खूपच स्तुती केली. दरम्यान या यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी अजित पवार हे लंके यांच्या घरी गेले होते. जे मोठ्या पवारांनी केलं तेच अजित दादांनी आज केलं. त्यामुळे पुन्हा राजकीय वावड्या उठण्यास सुरवात झाली.
शरद पवार लंके यांच्या अत्यंत साध्या घरात गेल्याने निलेश लंके आणि त्यांचे कुटुंबीय भारावून गेले होते. शरद पवार यांनी लंके यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली होती. शरद पवार यांच्यासोबत रोहित पवार आणि धनंजय मुंडे उपस्थित होते.
शरद पवार यांप्रमाणेच अजित पवार यांनीही लंके यांच्या घरी भेट दिली. लंकेचं अगदी साधं घर पाहून अजित पवार भारावून गेले. कुटुंबीयांनी पुष्पहार घालून अजित दादांचे स्वागत केले. अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबियांशीही चर्चा केली.
शरद पवारांपासून फारकत घेतल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रात आणि देशात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाढविण्याची योजना आहे. अजित पवार यांची निलेश लंके यांच्या निवासस्थानी भेट ही लोकसभा निवडणुकीची तयारी तर सुरू केली नाहीना? अशी चर्चा रंगली आहे.
अजित पवार सत्तेत आहेत. अजित पवार महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा लढवतील हे अजून तरी नाक्की नाहीये. राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या ठिकाणी अजित पवार चाचपणी करत आहेत. अजित पवार यांचा हा दौरा याचाच एक भाग असल्याचे चर्चा आहे. त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांचाच कित्ता गिरवला अशी चर्चा सुरु आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत आमदार निलेश लंके व नागरिकांनी खूप भव्य दिव्य केले. ५०१ किलोचा हार आणला होता. जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. एकप्रकारे शक्तिप्रदर्शनही झाले.
या दरम्यान रांगोळीद्वारे रेखाटलेल्या घड्याळाने लक्ष वेधून घेतले! अजित पवार आणि शरद पवार यांच्यात या चिन्हावरुन वाद सुरू आहे. आणि पारनेरमध्ये अजित पवार यांच्या स्वागतासाठी रांगोळीने घड्याळाची प्रतिकृती रंगविण्यात आल्याने चर्चा रंगली आहे.