Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे समर्थक असलेले अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला. त्यामुळे आमदार पावर यांना हा मोठा धक्का मानला जात असतानाच
आमदार राम शिंदे यांनी कर्जत तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करून दुसरा धक्का दिला आहे. यानिमित्ताने तालुक्यातील एक संस्था भाजपच्या ताब्यात आल्याने मतदार संघात पुन्हा रामराज्य सुरू झाल्याची चर्चा सुरू असतानाच मतदार संघातील या संस्थेची निवडणूक विरोधकांना माहीत ही पडली नाही असे चित्र काहीसे निर्माण झाले आहे. एक प्रकारे आ. रोहित पवार यांना हा धक्का असल्याचे मत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
कर्जत तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणूकिसाठी एकूण ३६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते ते सर्व मंजूर देखील झाले गेली काही वर्षांपासून या संस्थेची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. एकूण अवस्था पाहता संस्थेला उर्जितावस्था येणे गरजेचे होते.
यासाठी सहकार्यांनी आ.प्रा.राम शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून या संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी लक्ष घालावे यासाठी संचालक निवडीचे सर्वाधिकार आमदार प्रा.राम शिंदे यांना देण्यात आले. त्याप्रमाणे आ. शिंदे यांनी उमेदवारांची निवड जाहीर करुन बाकी अर्जदारांनी अर्ज माघार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले.
सर्व अर्जदारांनी या आवाहनास प्रतिसाद देत अर्ज माघारी घेऊन संस्था बिनविरोध करण्यास सहकार्य केले. त्यामुळे विरोधकांना कोणत्याही प्रकारची टीका करण्याची संधी न देता तालुका सहकारी खरेदी विक्री संघावर एकहाती सत्ता स्थापन केली आहे.