Ahmednagar Politics : सभासद, शेतकरी आणि कामगारांचा विश्वासघात ! सभासदही नसलेल्या खासदार सुजय विखे यांनी…

Published on -

Ahmednagar Politics : प्रवरा कारखान्याचा गणेश कारखान्यासोबत असलेला आठ वर्षांचा करार जून २०२२ला संपल्यानंतर विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाने कारखाना चालविला.

त्या काळात संचालक मंडळाने आर्थिक व्यवहार करण्याकरीता सह्यांचे अधिकार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना दिले. ते कारखान्याचे सभासद किंवा संचालक नसतानाही त्यांना सह्यांचे अधिकार का दिले गेले?

गणेश कारखान्याचे जिल्हा बँक आणि सेंट्रल बँकेत नियमित अकाउंट असतानाही प्रवरा बँकेत नवीन खाते उघडून तिथूनच का व्यवहार करण्यात आला? असे प्रश्न गणेश परिवर्तन मंडळाचे ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर यांनी उपस्थित केले आहेत.

श्री गणेश कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोंदकर बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, माजी चेअरमन अॅड. नारायणराव कार्ले, ज्येष्ठ नेते शिवाजीराव लहारे, संचालक अनिल टिळेकर, नानासाहेब नळे, अनिल गाढवे, विष्णुपंत शेळके, संपत हिंगे, अलेश कापसे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

डॉ. गोंदकर म्हणाले, खासदार डॉ. विखे गणेश कारखान्याचे संचालक किंवा सभासदही नाहीत. असे असतानाही त्यांना सह्यांचे अधिकार देण्यात आले. ते पूर्णतः बेकायदेशीर कृत्य आहे. प्रवरा सहकारी बँकेच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहारांवर खासदार डॉ. विखे पाटील यांच्या सह्या आहेत.

याबाबत संचालक मंडळाचे ठराव कारखान्याच्या रेकॉर्डमध्ये आढळत नाही. गणेशच्या सभासद, शेतकरी आणि कामगारांचा हा विश्वासघात आहे. यासंदर्भात आम्ही न्यायालयाचाही दरवाजा ठोठावणार आहोत. हा सभासदांचा कारखाना जिवंत ठेवण्यासाठी आम्ही सर्व प्रकारच्या संघर्षांची तयारी ठेवलेली आहे, असेही डॉ. गोंदकर म्हणाले.

चेअरमन लहारे यांनी गणेशची आर्थिक अडचण मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे जिल्हा बँकेने उदार अंतकरणाने आमचे पैसे देण्याचे आवाहन केले.

….ते पाच कोटी ८१ लाख जिल्हा बँकेने द्यावे

गणेश सहकारी साखर कारखान्याकडून राहुरी कारखान्याने घेतलेले पाच कोटी ८१ लाख रुपये देण्याची जबाबदारी जिल्हा बँकेची आहे. राहुरी सहकारी साखर कारखाना सध्या जिल्हा बँकेच्या ताब्यात असून, जिल्हा बँकेने ही रक्कम तातडीने गणेशच्या खात्यावर वर्ग करावी, असे आवाहन गणेश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe