राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना Bell’s Palsy नावाच्या गंभीर न्यूरोलॉजिकल आजाराचे निदान झाले आहे. यामुळे त्यांना सलग दोन मिनिटेही बोलणे कठीण झाले आहे. नुकतेच त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली होती, मात्र त्यानंतरच त्यांना या नवीन आजाराचा सामना करावा लागतोय. त्यांनी स्वतःच समाजमाध्यमांद्वारे (Ex-Twitter) ही माहिती शेअर केली आहे.
सार्वजनिक जीवनावर परिणाम
धनंजय मुंडे सध्या सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहू शकत नाहीत आणि त्यांना पुढील काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहिती दिली आहे. मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, लवकरच या आजारावर मात करून ते पुन्हा जनसेवेसाठी मैदानात उतरतील. मात्र, सध्या प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे, मंत्रिमंडळ बैठक आणि पक्षाच्या अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता येणार नाही.

धनंजय मुंडे यांची डोळ्यांवरील शस्त्रक्रिया
१५ दिवसांपूर्वी पद्मश्री डॉ. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या दोन्ही डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस प्रकाश, धूळ आणि उन्हापासून विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, या शस्त्रक्रियेनंतरच त्यांना Bell’s Palsy आजाराचा सामना करावा लागत आहे. सध्या त्यांच्यावर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.
Bell’s Palsy म्हणजे काय?
Bell’s Palsy हा चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम करणारा आजार आहे. मेंदूपासून चेहऱ्याच्या स्नायूंना जोडणाऱ्या फेशियल नर्व्हमध्ये सूज येते, ज्यामुळे चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी किंवा अर्धांगवायूची लक्षणे दिसू लागतात. हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो, परंतु व्हायरल इन्फेक्शन, इम्युन सिस्टममधील बदल किंवा अचानक तणाव यामुळे तो उद्भवतो.
Bell’s Palsy ची लक्षणे कोणती?
Bell’s Palsy झाल्यास व्यक्तीला चेहऱ्याच्या एका बाजूला अर्धांगवायूसारखी लक्षणे जाणवू शकतात. धनंजय मुंडे यांनाही अशीच काही लक्षणे जाणवू लागली असून, यामुळे त्यांना बोलताना त्रास होतो आहे.
महत्त्वाची लक्षणे :
बोलण्यास अडथळा – सलग दोन मिनिटेही व्यवस्थित बोलता येत नाही.
चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम – चेहऱ्याचा एक भाग हलत नाही किंवा अर्धांगवायूसारखी स्थिती निर्माण होते.
डोळ्यांचे नियंत्रण कमी होते – डोळ्याची उघडझाप नियंत्रित करता येत नाही, पापणी वेळेवर पडत नाही.
खाण्यापिण्याचा त्रास – अन्न गिळताना अडथळा येतो, जेवणाची चव कमी होते.
कानाच्या भागात वेदना – कानात वेदना किंवा अवाजांबाबत संवेदनशीलता वाढते.
डोळे कोरडे पडतात – अश्रूं कमी होते, त्यामुळे डोळे जळजळतात.
सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती
धनंजय मुंडे यांनी सांगितले की, सध्या त्यांच्यावर औषधोपचार सुरू असून, डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. काही दिवसात त्यांची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे, मात्र हा आजार बरा होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात.
राजकीय आणि प्रशासकीय कामांवर परिणाम
Bell’s Palsy च्या त्रासामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळ बैठक, पक्षाचे जनता दरबार आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्य नाही. मात्र, ते लवकरच या आजारावर मात करून पुन्हा कामावर परत येण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयांवर आणि धोरणात्मक कामकाजावर थोडा परिणाम होऊ शकतो. मात्र, पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे.