मागील अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जीवाची बाजी लावून अन्नत्याग व उपोषण करून मराठा आरक्षणाचा प्रश्न अखेर धसास लावलेला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षाची मराठा समाजाची मागणी जरांगे पाटील व सरकारमुळे पूर्ण झाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत जरांगे यांच्यासह सरकारचे अभिनंदन करत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केली. टाकळी ढोकेश्वर येथे फटाके फोडत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्यासह अनेक मराठा आमदारांनी हिवाळी अधिवेशनात थेट विधिमंडळा समोर उपोषण करत मंत्रालयाच्या कार्यालयाला कुलूप लावले होते. तर यासंबंधी अधिवेशनात लक्षवेधीही मांडली होती.

शुक्रवारी रात्री महायुती सरकारने या मराठा आरक्षणा संदर्भात अध्यादेश काढला असून आमदार निलेश लंके यांनी टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात कार्यकर्त्यांसमवेत फटाके फोडत आपला आनंद व्यक्त केला. यावेळी युवा नेते दीपक लंके, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढल्यानंतर आमदार निलेश लंके म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांनी गेले अनेक महिन्यापासून जे आंदोलन सुरू केले आहे त्यास आंदोलनाला आता खऱ्या अर्थाने यश आले आहे. त्यामुळे सरकारने सुद्धा मराठा आरक्षणाबाबत नवा अध्यादेश काढून एक चांगला निर्णय घेऊन या समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली असल्याचे आमदार लंके म्हणाले.
जरांगे पाटलांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारला होता व त्या लढ्याला अखेर यश आले आहे असे आमदार निलेश लंके म्हणाले. जरी सरकारमध्ये सहभागी असलो तरी मराठा समाज व आरक्षण हे प्रथम आहे व महत्वाचे असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.