Ahmednagar Politics : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा आनंदच – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे

Published on -

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि जिल्ह्यात कोणी कितीही यात्रा आणि दौरे केले तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधींनी काँग्रेस संपविण्याचा संकल्प भारत जोडो यात्रेत केला आहे. आत्ताच्या यात्रेत तो संकल्प ते सिद्धीस नेतील, अशी उपरोधीक टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

शिवजयंती सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, ज्यांनी जनाधार गमावला आहे, त्यांनी अशा यात्रा काढणे अभिप्रेत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे दौरे आणि राहुल गांधींची यात्रा याचा कोणताही परिणाम महायुतीवर होणार नाही.

कारण या दोघांनाही आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत, हे माहिती नाही. ठाकरे केवळ व्यक्तिगत गरळ ओकण्याचे काम करत आहेत. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी केव्हाच फारकत घेतली आहे. त्यांना जनाधार मिळणार नाही, असा दावा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाचा आनंदच आहे. आमचा आग्रह त्यांना खुप पूर्वीपासून होता. कारण काँग्रेसमध्ये आता काहीच शिल्लक राहिलेले नाही. राहुल गांधी यांना समाज आणि राजकारणाचा अभ्यास नाही.

यापुर्वी त्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. त्यामध्ये काँग्रेस संपविण्याचा संकल्प त्यांनी केला होता. आत्ताच्या यात्रेत तो संकल्प ते सिध्दीस नेतील. काँग्रेसमध्ये राहुन काही नेते भाजपाच्याच नेत्यांचे रात्री पाय धरत आहेत.

लोकसभेची उमेदवारी मागण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. आम्ही नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारे कार्यकर्ते आहोत. नेतृत्व जो निर्णय घेईल, तो आपण मान्य करायचा ही आमची भूमिका आहे.

काँग्रेस नेतृत्वहीन झाली असून, तशी अवस्था भाजपाची नाही. मागील ५ वर्षात कोणी चागले काम केले, याचा विचार करुन, पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

कांदा निर्यात बंदी उठविण्याचा निर्णय झाल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे आभार मानले; परंतु या निर्णयावर खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रीयेला आपण महत्व देत नाही,

असे सांगून अनेक वर्षे तुमच्याकडे केंद्रातील पदं होते. शेतकऱ्यांकरीता कोणते आयात निर्यात धोरण आपण घेतले, हे एकदा तरी जाहीर करा. सल्ले देणे सोपे असते, अंमजबजावणी करणे महत्वाचे असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News