मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर आंदोलन करत रान पेटवले होते. परंतु समाजाच्या काही मागण्या मान्य न झाल्याने यांची धग अद्यापही मराठे समाजाच्या मनात धगधगत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी सूचना दिल्या असल्या तरी मराठे समाज आक्रमक असल्याचे चित्र आहे.
याची प्रचिती पुन्हा नांदेड जिल्ह्यात आली आहे. स्वतः माजी मुख्यमंत्री सध्या भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना याचा चांगला फटका बसला. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चव्हाण यांना गावातून बाहेर जाण्यास भाग पाडले. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे ही घटना घडली.

नेमकी काय घडली घटना ?
प्रतापराव पाटील चिखलीकर हे भाजपकडून नांदेड लोकसभा मतदार संघात उभे आहेत. त्यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने अशोकराव चव्हाण कोंढा गावात आलेले होते. परंतु ही माहिती समजताच शेकडो मराठ्यांनी तेथे गर्दी केली.
‘एक मराठा-लाख मराठा’ सह विविध घोषणा गावकऱ्यांनी दिल्या. यावेळी शेकडो मराठा समाज बांधवांचा रोष पाहून अशोक चव्हाण यांनी तेथून काढता पाय घेणे पसंद केल्याची माहिती समजली आहे.
गावबंदीचा फटका बसणार
नांदेड जिल्ह्यासह इतर अनेक भागात अनेक उमेदवारांना मराठा समाजाच्या आंदोलनाचा फटका बसेल असे दिसते. अनेक भागात गावबंदीचा असून विविध पक्षाच्या नेत्यांना गावबंदीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवला जात आहे.
त्यामुळे नेते मंडळींमध्येही याबाबत चिंतेचे वातावरण आहे. मराठा आरक्षणाबाबत समाज आक्रमक असून सगेसोयरे अंमलबजाणीसाठी मनोज जरांगे पाटील व समाज आजही आग्रही असल्याने काही ठिकाणी मराठा बांधवांचा असा रोष पाहायला मिळत आहे.