महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणूकीतील उमेदवार नीलेश लंके यांनी राजीनामा दिल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणूकीसाठी त्यांच्या पत्नी राणीताई लंके या उमेदवार असतील असा संदेश राणी लंके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिला. दरम्यान, लंके यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हयासह संपूर्ण नगर दक्षिण मतदारसंघातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पारनेरमध्ये हजेरी लावली होती.
पंचायत समितीच्या माजी उपसभापती, जिल्हा परीषदेच्या सदस्या असलेल्या राणीताई लंके या लोकसभेच्या उमेदवार असतील अशी चर्चा होती. शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून लंके यांनी दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघ पिंजुन काढला होता. विविध कार्यक्रमांनाही त्यांची लागणारी हजेरी लक्षवेधी होती. ऐनवेळी मात्र राणीताई लंके यांचे नाव मागे पडून स्वतः नीलेश लंके यांना लोकसभेच्या निवडणूकीत उडी घ्यावी लागली.

त्यासाठी त्यांनी अजित पवार यांच्या गटातून शरद पवार गटात प्रवेश केला आणि तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढविली. लंके यांनी गेल्या दोन वर्षात या मतदारसंघात केलेल्या साखर पेरणीच्या जोरावर त्यांनी भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यापुढे तगडे आव्हान उभे करून सध्या ते निवडणूकीच्या रेसमध्ये आहेत.
लंके हे लोकसभेत गेल्यानंतर त्यांच्या पत्नी राणीताई लंके या विधानसभेच्या उमेदवार असतील अशी चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती. परंतू राणीताई यांच्या दि. २४ मे रोजीच्या वाढदिवसानिमित्त ही चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. गुरूवारी रात्रीपासूनच भावी आमदार राणीताई लंके अशा पोस्ट सुरू झाल्या. शुक्रवारी दिवसभर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नगर जिल्हयातून विशेषतः दक्षिणेतून मोठया संख्येने कार्यकर्त्यांनी पारनेरात हजेरी लावली होती. अनेकांनी आणलेल्या केकवर भावी आमदार राणीताई असा उल्लेख होता.
लोकसभेसाठी लंके यांचा राजीनामा
लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी नीलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्या समर्थकांसाठी धक्का देणारा होता. त्यांनी निर्णय जाहिर केल्यानंतर अनेकांच्या डोळयात आश्रू उभे राहिले. लंकेे यांच्याप्रती असलेल्या प्रेमातूनच विधानसभेसाठी त्यांच्या पत्नीचे नाव पुढे करीत कार्यकत्यांनी राणीताई यांचे आतापासूनच लॉन्चिंग सुरू केले आहे.