Maha Cabinet Meeting : अहिल्यानगरात दुष्काळाची आग, सरकारच्या मेजवानीला रंग : जनतेच्या तोंडाला पाणी नाही, मंत्र्यांच्या थाळीत मिष्टान्न!

अहिल्यानगर जिल्हा सध्या अभूतपूर्व दुष्काळाच्या विळख्यात सापडला आहे. पाण्याची टंचाई, चारा संकट आणि शेतकऱ्यांचे नुकसान यामुळे जनता त्रस्त आहे. याच वेळी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त २९ एप्रिल रोजी चोंडी येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Published on -

अहिल्यानगर, दि. २२ एप्रिल २०२५: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चोंडी येथे २९ एप्रिल रोजी मंत्रिमंडळाची विशेष बैठक होत आहे. (Cabinet Meeting in Ahilyanagar) यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह ३०० व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी खास खानदेशी आणि मराठवाडी पदार्थांचा मेन्यू तयार करण्यात आला आहे.

शिपी आमटी, पुरणपोळी, डाळबट्टी, मासवडी, आमरस चपाती यासारख्या १५ ते २० पारंपरिक पदार्थांचा समावेश आहे. याशिवाय २,००० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी केटरिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या मेजवानीवर लाखो रुपये खर्च होणार आहेत.

दुष्काळात जनता तडफडतेय

पण याच वेळी अहिल्यानगर जिल्हा अभूतपूर्व दुष्काळाशी झुंजतोय. यंदा प्रथमच एप्रिलमध्येच विहिरी कोरड्या पडल्या आहेत. माणसांना पिण्याचे पाणी नाही, जनावरांना चारा नाही. चारा वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. शेतकरी आपली पिके जाळण्यास मजबूर आहेत. स्थानिक शेतकरी रमेश पाटील (नाव बदललेले) यांनी सांगितले, “ माझ्या शेतातील दीड एकर ऊस पाण्याअभावी जाळावा लागला. जिल्ह्यात अशी किती तरी उदाहरणे आहेत. आम्हाला जगायचे की मरायचे?”

नगरचे प्रश्न सोडवायला बैठक पण त्यात मिष्टान्न

एकीकडे शेतकरी आणि सामान्य जनता पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी वणवण भटकत आहे, तर दुसरीकडे सरकार कोट्यवधी रुपये खर्चून मंत्रिमंडळ बैठकीच्या नावाखाली मेजवानी आयोजित करत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. “नगरचे प्रश्न सोडवायला बैठक घ्यायची, पण त्याच बैठकीत मिष्टान्न खायची? यांना खरंच जनतेची काळजी आहे का?

दुष्काळावर चर्चा कधी?

या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळावर चर्चा होणार का, पाणीटंचाई आणि चारा संकटावर ठोस उपाययोजना जाहीर होणार का, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्टता नाही. उलट, बैठकीच्या नावाखाली होणारा हा खर्च आणि मेजवानीचा थाट पाहून जनतेत सरकारबद्दल नाराजी वाढत आहे. “दुष्काळात जनता तडफडत असताना मंत्र्यांच्या थाळीत मिष्टान्न आणि आमच्या तोंडाला पाणी नाही. हा कसला न्याय?

सरकारची प्राथमिकता नेमकी काय

अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित मंत्रिमंडळाची बैठक आणि त्यावर होणारा सव्वा कोटी रुपयांचा खर्च, हे पाहता सरकारची प्राथमिकता नेमकी काय आहे, असा प्रश्न जनतेला पडला आहे. एकीकडे, सरकार कडे पैशांचा तुटवडा असल्याचे सांगून विविध योजनांवर कात्री लावली आहे, दुसरीकडे तीच सरकार तीन दिवसांच्या बैठकीवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. याच मुद्द्यावर सामान्य लोकांत मोठा असंतोष आहे.

लोक चिडणार नसेल तर नवलंच.

मंत्रिमंडळ बैठकीसाठी ज्या प्रकारे भव्य तयारी केली जात आहे, ती पाहता सरकारला लोकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेतल्याचं कधीच दिसत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याचा तुटवडा, बेरोजगारी आणि दुष्काळाच्या संकटाने होणारा शेतकऱ्यांचा शोक यावर विचार करण्याचे सरकारला वेळ आहे का? सरकारच्या या अनावश्यक खर्चावर स्थानिक लोक चिडणार नसेल तर नवलंच.

कर्ज माफीचे आश्वासन हवेत

सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्ज माफीची घोषणा केली होती, मात्र आता त्याच सरकारने कर्ज माफीचे आश्वासन हवेत सोडले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तणाव वाढलेला आहे. त्यांची सर्वात मोठी मागणी म्हणजेच कर्जमाफी आता निराधार ठरली आहे. सरकारच्या या बेपर्वा वृत्तीमुळे अहिल्यानगरातील जनतेचा संयम सुटत चालला आहे. दुष्काळावर उपाय शोधण्याऐवजी मेजवानीवर लाखो रुपये उधळणाऱ्या सरकारला जनता कधी माफी देणार? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News