विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकारांमागे अनेक खलनायक : खा. संजय राऊत यांची महायुतीवर पुन्हा टीका

Sushant Kulkarni
Published:

४ फेब्रुवारी २०२५ नाशिक : विधानसभा निवडणुकीत शेवटच्या एक-दीड तासात झालेल्या मतदानाविषयी आता उच्च न्यायालयानेच निवडणूक आयोगाकडे खुलासा मागवल्याने निवडणुकीत झालेल्या अनेक प्रकारांवर शिक्कामोर्तब झाले आहे.त्यामुळे आता न्यायालयाने या प्रकाराबाबत शेवटपर्यंत जायला हवे.

त्याशिवाय लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकणार नाही,असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी केले.खा. राऊत सोमवारी नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले की, न्यायालयाने विधानसभा निवडणुकीत शेवटच्या एक-दीड तासात झालेल्या ७६ लाख मतांबाबत निवडणूक आयोगाकडे स्पष्टीकरण मागितले आहे.

यामुळे खरा कळीचा मुद्दा तोच आहे की, शेवटच्या काही तासांत इतके मतदान कसे होऊ शकते ? याबाबत आम्ही देखील निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले आहे. मात्र, निवडणूक आयोगाला अद्याप त्यावर खुलासा करता आलेला नाही.या सर्व प्रकारामागे विधानसभा निवडणुकीची पटकथा पडद्याआडून लिहिली गेली आणि त्यात भाजपमधील अनेक खलनायकांचा सहभाग असल्याचा दावा खा. राऊतांनी केला.

राज्यातील जवळपास १५० विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी २० ते २५ हजार इतके जास्त मतदान झाले असून त्याचाच एक भाग म्हणून उत्तम जानकर यांच्या मतदारसंघातील मरकडवाडी गावाने पुन्हा मतदान घेण्याची केलेली मागणी कौतुकास्पद आहे. मात्र, अशा प्रकारची मागणी केली की लोकांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप खा. राऊत यांनी महायुतीवर केला.

शिंदेंचा पक्ष हा शाहांचा पक्ष

एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा भाजपचा आणि त्यातही अमित शाह यांचा पक्ष आहे. त्यांचा पक्ष फार काळ एकसंध राहील, असे वाटत नाही. कारण, या पक्षातील जवळपास २० आमदार देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचा दावा राऊतांनी पुन्हा एकदा केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्याविषयी राऊतांना विचारले असता शिंदे कोमातून बाहेर कधी आले ? असा प्रश्न करत त्यांनी मतदारांचे आभार मानण्याऐवजी ईव्हीएम आणि अमित शाहांचे आभार मानायला हवेत, असा टोला लगावला.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe