पारनेर- पारनेर तालुक्यातील सुपा, म्हसणे, भाळवणी तसेच लगत असलेल्या रांजणगाव गणपती, अहिल्यानगर येथील औद्योगिक वसाहतींचा झपाट्याने होत असलेला विस्तार हा पारनेर नगर मतदारसंघातील तरुणांसाठी खूप मोठी संधी घेऊन येत आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी तरुणांमध्ये कौशल्य आधारित शिक्षणाची गरज असून, हीच गरज भागवण्यासाठी तालुक्यातील सेनापती बापट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्याचबरोबर शासकीय तांत्रिक विद्यालयाचे आधुनिकीकरण करून तरुणांना कौशल्य आधारित शिक्षण देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आ. दाते यांनी सांगितले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आ. काशिनाथ दाते यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत संस्थेमध्ये नवीन व्यवसाय अभ्यासक्रम वीजतंत्री तिसरी व चौथी तुकडी त्याचबरोबर न्यू एज कोर्सेसमधील सोलर टेक्निशिएन हा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणे, त्याचबरोबर पारनेर तालुक्यातील खासगी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांमधून तांत्रिक अभ्यासक्रमाची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी, यासाठी शासकीय तांत्रिक विद्यालय पारनेर या ठिकाणी द्विलक्षी अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा, त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत पाठपुरावा मंत्रालय स्तरावर करण्यात येईल, असे आश्वासन आ. दाते यांनी दिले.

त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नूतनीकरण व विस्तारीकरण कामासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी राज्य योजनेतून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आ. दाते यांनी दिले. आ. दाते यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शासकीय तांत्रिक विद्यालय यांच्या नूतनीकरण व विस्तारीकरणाबाबत महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार व उद्योजकता मंत्री ना. मंगल प्रभात लोढा यांच्याकडे याबाबत मागणी केली होती, याची दखल घेत संबंधित विभागाने काल पारनेर येथे सेनापती बापट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सदर बैठक आयोजित करण्यात आली होती.
या वेळी संस्थेमार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती घेत त्यांनी समाधान व्यक्त केले या वेळी आ. दाते यांच्या समवेत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील दगडू शिंदे, प्राचार्य मुकुंद महामुनी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. सुरोशे, अमोल मैड, प्रताप अंबुले, दत्तात्रय शेरकर, शेखर कदम, दीपक सोनवणे, मनोज वाणी, सौ. अश्विनी गागरे, सौ. सुमैय्या रोटीवाले, राजेंद्र जैन, दत्तात्रय शिंदे, संकल्प नेटके, सौ. विद्या नांगरे, सुमित घोडके, सौ. शिल्पकला बनसोडे आदी उपस्थित होते.