Ahmednagar Politics : दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रथमतः आरोपांची भीती दाखवायची नंतर वारंवार चौकशीच्या कारवाईचा उल्लेख करायचा आणि या पद्धतीने भीती निर्माण करून त्यांना आपल्या बाजूला वळवून घ्यायचे,
वेळप्रसंगी पक्षात सामावूनही घ्यायचे, ही भाजपची विकृत कार्यपद्धती आता सर्वसामान्यांच्या परिचयाची झाली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनामा प्रकरणावर आमदार लहू कानडे यांनी व्यक्त केली.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात आ. कानडे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान मधील एका सभेत महाराष्ट्रमध्ये ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचे सुतोवाच केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटून ना. अजित पवार भाजपाच्या वळचणीला गेले.
तसेच चारच दिवसांपूर्वी संसदेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यूपीए काळातील आर्थिक गैरव्यवहाराबाबत अनावश्यकरीत्या श्वेतपत्रिका जाहीर केली आणि त्यामध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना घडलेल्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला आणि आज ना. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपा जाण्याचे संकेत दिले आहेत.
ही आत्मविश्वास गमावलेल्या भारतीय जनता पक्षाची इतर पक्ष फोडण्याची लोकशाही विरोधी कार्यपद्धती आहे. त्यांना जनताच धडा शिकवेल, असे आमदार कानडे म्हणाले.