Ahmednagar Politics : भाजप पक्ष सध्या घाबरलेला आहे. लोक आपल्याला मतदान करणार नाहीत, हे त्यांना कळलं आहे, त्यामुळे भाजप इतर पक्षांतील अशोक चव्हाण, अजित पवार यांच्या सारखे मोठे नेते फोडत आहेत. आता एवढे मोठे नेते आल्यावर त्यांना पद द्यावेच लागेल.
अशावेळी मला भाजपच्या अनेक वर्षांपासूनचे नेते व कार्यकत्यांबाबत वाईट वाटतं. कारण आयात केलेले नेते पद घेतील, मंत्री होतील आणि वर्षानुवर्षे भाजपचे काम करणारे रिकामेच राहतील.
महाराष्ट्राचे बोलायचं तर २०२४ नंतर भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना लोक थारा देणार नाहीत, हा विश्वास आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील पिंपरखेड, फक्राबाद, खर्डा, दिघोळ दौऱ्यावर आले असता आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना विविध विषयांवर भाष्य केले.
आ. रोहित पवार म्हणाले, भाजपला महाराष्ट्रात पुरोगामी, संतांचा विचार संपवायचा आहे. ज्या ज्या घराण्यांनी हा विचार जपला, त्यांच्या पुढच्या पिढींना, पक्षांना संपवायचं असं भाजपचे धोरण आहे.
नवीन तरूण पिढीला चुकीच्या मार्गाने नेण्याचं काम भाजप करीत आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या संभाव्य निकालावरही आमदार रोहित पवार यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत आधीच निकाल दिला आहे.
आता विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेबाबत १५ फेब्रुवारीला निकाल देतील, अशी माहिती आहे. परंतू शिवसेनेबाबत त्यांनी दिलेला निकाल आणि निवडणूक आयोगाने दिलेला निकाल पाहता राष्ट्रवादीच्या प्रकरणातही ते फार वेगळा निकाल देतील, असे वाटत नाही. आ.
पवार यांनी पक्षांतर्गत तसेच अजित पवारांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या संघर्षावरही भाष्य केले. ते म्हणाले, मला कधीही कोणी गद्दार म्हटलेले आवडणार नाही. आजोबांचे वय झाल्यावर अडचणीच्या काळात नातू पळून गेला असं कोणी म्हटलेलं चालणार नाही.
आजोबा लढत असताना आम्हीही फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार घेऊन लढत आहोत. या विचारांशी प्रतारणा करणारे भाजप बरोबर गेले. पण मला विश्वास आहे,
येणाऱ्या विधानसभेत ७० टक्के चेहरे नवीन असतील. सामान्यांचे प्रतिनिधित्व करणारे असतील. त्यादृष्टीने शरद पवार साहेबही नवीन चेहऱ्यांना संधी देतील.