आम्ही गुंडगिरी करत नाही, परंतू तुमचे तसे म्हणणे असेल तर तुमच्याशी गुंडगिरी करण्याची आमची तयारी आहे. तुम्ही सांगा आम्ही दोन हात करू, तुम्ही वेळ सांगा असे आव्हान देत सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीमधील वातावरण आपण असुरक्षित होऊ देणार नाही असा ठाम विश्वास खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केला.
खा. नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक महिन्यातील एका रविवार गड किल्ले संवर्धन करण्याचा संकल्प त्यांनी केला. त्यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खा. नीलेश लंके हे बोलत होते. पत्रकारांनी सुपा-पारनेर औद्योगिक वसाहतीसंदर्भात होणाऱ्या आरोप प्रत्यारोपासंदर्भात पत्रकारांनी छेडले असता खा. लंके यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडली.

खा. लंके म्हणाले, नगर एमआयडीसीची काय अवस्था झाली ? ही वसाहत बंद पडली आहे. आरोप करणारांनी त्यांच्या भागात एखादा उद्योग आणावा. सुपा एमआयडीसीमध्ये कोणाचीही तक्रार नाही. तरीही उठ सुट सांगायचे की गुंडगिरी थांबवा. गुंडगिरी कोणाची आहे ? ते त्यांनी नाव घेऊन सांगावे. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही गुंडगिरी करतो, त्यावर आमचे म्हणणे आहे की आम्ही गुंडगिरी करत नाही.
परंतू तुमचे म्हणणे असेल तर तुमच्याशी गुंडगिरी करण्याची आमची तयारी आहे. आमच्याकडे ताकद आहे, तुम्ही सांगा आम्ही दोन हात करू, तुम्ही वेळ काळ सांगा. पाठीमागून याला त्याला त्रास देण्याचे काम करू नका. मी एमआयडीसीचे वातावरण असुरक्षित होऊ देणार नाही असा ठाम विश्वास खा. लंके यांनी व्यक्त केला.
यंत्रणेचा गैरवापर करून तहसिलदार, प्रांत यांना औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांच्या गौण खनिजाची चौकशी करा, नोटीस बजावा असे पालकमंत्र्यांकडून सांगितले जाते. वास्तविक पाहता एमआयडीसीने प्लॉट दिल्यानंतर उद्योगाचे काम सुरू असताना तिथे महसूल विभागाने जाण्याचा काय सबंध ? उद्योजकांची पिळवणूक कशी करता येईल ? त्यांच्यावर जास्तीत जास्त दंडात्मक कारवाई कशी करता येईल असा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खा. लंके यांनी केला.
मधल्या काळामध्ये हददच केली, कामगार आयुक्तांना सांगून सर्व कामगार ठेकेदारांचे सर्व परवाने रदद करण्यात आले. सर्व नियमात असताना, उद्योजकही हे ठेकेदार पात्र आहेत असे सांगतात. असे असतानाही सर्व परवाने रद्द करायचा घाट घातला गेला. एकाच दिवशी सर्व परवाने रद्द झाले तर औद्योगिक वसाहत बंद पडेल अशी भिती खा. लंके यांनी व्यक्त केली.
पंतप्रधानांना भेटणार
उद्योग मंत्र्यांसमवेत बैठक बोलाउन एमआयडीसीचा विभागीय अधिकारी सांगेल तसे उद्योजकांनी ऐकले पाहिजे असे बंधन घालण्याचा प्रयत्न केला गेला. उद्योजकाला प्लॉट वितरीत करण्याचे विभागीय अधिकाऱ्याचे काम आहे. त्यानंतर त्यांचा काहीही सबंध नाही. कोणाला कॉन्ट्रक्ट द्यायचे हे ठरविणारे विभागीय अधिकारी कोण ? एमआयडीसीमध्ये जाणीपुर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याने मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले असून शरद पवार यांच्या माध्यमातून मी नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांनाही पत्र दिले असून त्यात सगळा घटनाक्रम नमुद करण्यात आला आहे – खासदार नीलेश लंके लोकसभा सदस्य
औरंगजेब समाजसुधारक नव्हता
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात पत्रकारांनी छेडले असता खा. लंके म्हणाले, औरंगजेब समाजसुधारक नव्हता. त्याची कबर ठेवण्याचे काहीच कारण नाही ती कबर काढून टाकण्यात यावी अशी भूमिका खा. लंके यांनी मांडली.