Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांनी आपल्या राजकीय खेळीस व पुढील वाटचालीस सुरवात केली आहे. आज (दि.१ एप्रिल) त्यांनी मोहटादेवी गडावरून स्वाभिमान जनसंवाद यात्रेस सुरवात केली. ही यात्रा १५ दिवसात चालणार असून मतदार संघातील प्रत्येक गावात जात नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे.
हा एक मास्टरस्ट्रोक ठरू शकतो असा काहींचा कयास आहे. या यात्रेच्या शुभारंभप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार लहु कानडे, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, संदेश कार्ले, अभिषेक कळमकर आदींसह शिवसेना, काँग्रेस, आपच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
लंके यांच्यावर मतांचा पाऊस पडेल : जयंत पाटील
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, दिल्लीपुढे कोणत्याही परिस्थितीत झुकायचे नाही. सर्वसामान्य जनतेचे कसब मांडण्याची कला आमदार नीलेश लंके यांच्यात असून सर्वसामान्य जनता त्यांच्यावर मतांचा पाऊस पाडेल असे ते म्हणाले.
सामान्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर नीलेश लंके यांना संधी देणे गरजेचे असून राजकारणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या विचारांची देशाला व राज्याला गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अहमदनगर मतदारसंघात पैशवाईंच्या चढाया होतील, दिल्ली समोर झुकायचे नाही. स्वाभिमानाची ही लढाई सुरू आहे. जे सरदार पळाले आहेत ते पाचव्या रांगेत उभे राहतात अशी टीका नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर केली.
पाणी प्रश्न, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष : आ. तनपुरे
आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील यावेळी तोफ डागली. ग्रामीण भागातील प्रश्न महत्त्वाचे असून शेतकर्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. वांबोरी चारी, पाण्याचे प्रश्न अद्यापही सुटलेले नसून या सरकारने शेतकऱ्यांचा विचार केला नाही. शेतकर्यांचे विचार करणारे सरकार महाविकास आघाडीचे असल्याने हे खोटारडे सरकार उलथून टाकण्यासाठी ही संधी असल्याचे तनपुरे म्हणाले.
कर्डिले ज्यांच्या बरोबर त्यांचा पराभव होतोच : प्रा. गाडे
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सर्व सामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली असल्याने आता जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले हे ज्यांच्या बरोबर व पाठीमागे आहेत, त्यांचा पराभव नक्की असल्याचे प्रतिपादन जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केले.
हा असा गेल्या अनेक निवडणूकीतील अनुभव असल्याचे गाडे म्हणाले. आमदार प्राजक्त तनपुरे जोरात प्रचार यंत्रणा कार्यान्वित करून सर्व सामान्य कुटुंबातील निलेश लंके यांना खासदार करा असे आवाहन जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी यावेळी केले.