Ahmednagar News : आपल्या हक्कांसाठी प्रत्येकालाचं झगडावे लागते. आपले हक्क जर मिळतं नसतील तर याच्या विरोधात आवाज बुलंद करावा लागतो. अहमदनगरमधून असंच एक उदाहरण समोर येत आहे.
खरंतर, आज अर्थातच 30 जानेवारी 2024 ला विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील पालिकेच्या आझाद मैदानावर जनता दरबार आयोजित केला होता.

दरम्यान, आजच्या याच जनता दरबारात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे दहावीच्या एका विद्यार्थ्याचे धाडस पाहून भारावलेत. खरे तर या जनता दरबारात दहावीचा एक विद्यार्थी दाखल झाला.
या विद्यार्थ्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यापुढे त्याचे गाऱ्हाणे मांडले. या विद्यार्थ्याच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपले आहे, मात्र त्याला बालसंगोपन योजनेचा लाभ मिळत नाहीये.
यामुळे त्यांनी या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अंबादास दानवे यांच्याकडे मागणी केली. या दहावीच्या विद्यार्थ्याचे नाव आहे त्रिदेव रवींद्र कापसे. त्रिदेव जनता दरबारात आला आणि त्याने दानवे यांच्यापुढे त्याच्या तक्रारीचा पाढा वाचला. त्रिदेव हा मोरगे वस्ती येथे राहतो.
त्याच्या वडिलांचे निधन 2016 मध्ये झाले. दुसरीकडे त्याची आई शहरात धुणी भांडीची कामे करते. यामुळे त्याला शिक्षणासाठी आर्थिक अडचण भासू लागली आहे. म्हणून बालसंगोपन योजनेतून दरमहा आर्थिक मदत मिळाली तर शिक्षणाचा खर्च भागेल असे त्याने यावेळी म्हटले आहे.
विशेष बाब अशी की, त्रिदेव जनता दरबारात एकटाच आला होता. त्याच्यासोबत कोणीच नव्हतं. यामुळे त्याचे हे धाडस पाहून विरोधी पक्षनेते दानवे स्वतः भावुक झालेत, भारावले गेलेत. यामुळे दानवे यांनी त्याला दहा हजार रुपयाची तात्काळ मदत दिली. मात्र त्रिदेवने ही मदत घेण्यास नकार दिला आणि मला फक्त योजनेचा लाभ मिळवून द्या असे यावेळी सांगितले.
त्रिदेव यांच्या या धाडसाने भारावलेले दानवे जनता दरबार आटोपल्यानंतर पुन्हा एकदा त्रिदेवकडे गेलेत, यावेळी त्यांनी त्रिदेवला मोठा झाला तर माझी एकदा अवश्य भेट घे, असे सांगितले. तसेच, तू जर मोठा राहिला असता तर तुला माझ्यासोबत घेतले असते असे देखील दानवे यांनी त्रिदेवला सांगितले आहे.