अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेने 10 आमदार आणि एक सभापती असे अभूतपूर्व यश महायुतीला दिले आहे. मागच्या निवडणुकीत ‘मी आजी होतो मात्र हे माजी होते’ आता हे आजी झालेत आणि मी माजी झालोय. आता मी एकटा माजी आहे तरी मला आजी करा अजून ४ वर्षे बाकी आहे. तोपर्यंत लोक विसरून जातील माझा भाषणापुरता उपयोग करून घेऊ नका. मी साकळाईचा प्रश्न सोडला, आजी असणाऱ्या पेक्षा मी ५० टक्के काम जास्त करत आहे असे वक्तव्य माजी खा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
नगर तालुक्याच्या वतीने पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापती व महायुतीचे नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आ.शिवाजीराव कर्डिले, आ.संग्राम जगताप, आ.मोनिका राजळे, आ.काशिनाथ दाते, आ.विठ्ठलराव लंघे, आ.विक्रम पाचपुते, आ.अमोल खताळ, मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील, भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले, बाबूशेठ टायरवाले, नितीन दिनकर, अभय आगरकर, अनिल शिंदे, विनायक देशमुख, अशोक सावंत, सुनील साळवे, शहाजीराजे भोसले आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी खा. सुजय विखेंनी वरील उद्गार काढले.

यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील जनतेने महायुतीला मोठा कौल दिला असून १० आमदार निवडून आले आहे. त्यामुळे जनतेची अपेक्षा देखील वाढली आहे, आता आपली जबाबदारी देखील वाढली असून मोठे काम करावे लागणार आहे. नगर जिल्ह्यात ३ एमआयडीसी मंजूर झाल्या असून औद्योगिक वातावरण निर्माण करायचे आहे किमान जिल्ह्यातील १० हजार भूमिपुत्रांना रोजगार निर्माण होईल. लवकरच उद्योजकांशी बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. एमआयडीशी भागामध्ये खंडणी, बादरांचा उद्रेक झाला असून त्यांचा बंदोबस्त करणार.
जिल्ह्यातील पाणी प्रश्न देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. जिल्ह्याचा विकास आपणच करू शकतो बाहेरच्या पुढार्यांनी आपले प्रश्न सोडवले नाही. भांडणे लावून स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम केले आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला साकळाई पाणी योजना मंजूर केली आहे. पाईपद्वारे पाणी देण्याचे काम केले जाणार आहे. आ. कर्डीले यांनी जिल्ह्यातील सर्व आमदारांना एकत्रित करून त्यांचा सत्कार केला व चांगले काम करण्यासाठी ऊर्जा व प्रेरणा देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे म्हणाले की जीवनामध्ये वावरत असताना ‘श्रद्धा आणि सबुरी’ ठेवावी लागते. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्यात सर्वात मोठे बहुमत मिळाले आहे. पालकमंत्री यांच्या माध्यमातून मागील अडीच वर्षांमध्ये लोकभिमुख विकास कामे झाले असल्यामुळेच महायुतीचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आले आहेत असे ते म्हणाले.
माजी खा. सुजय विखेंच्या वक्तव्याची चर्चा
दरम्यान, माजी खा. सुजय विखेंच्या वक्तव्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे. मी माजी झालोय. आता मी एकटा माजी आहे तरी मला आजी करा अजून ४ वर्षे बाकी आहे. तोपर्यंत लोक विसरून जातील असे त्यांनी जे वक्तव्य केले आहे त्यामुळे आता अहिल्यानगरमध्ये पुन्हा एकदा काहीतरी राजकीय बदल होतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.