राहुल झावरे हल्ला प्रकरण : पारनेरमध्ये गेल्या २४ तासांत काय काय घडलं ? समोर आली ही धक्कादायक माहिती…

Ahmednagarlive24
Published:

लोकसभेचा निकाल लागल्यानंतर पारनेर तालुक्यात सोशल मीडियावर लंके समर्थक व विखे समर्थक यांच्यात शाब्दिक चकमक उडत होती. त्याचे रूपांतर होऊन खा. निलेश लक व माजी खासदार सुजय विखे यांच्यात गुरुवारी जोरदार राडा झाला.लंके यांचे खंदे समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला झाला असून, ते गंभीर रित्या जखमी झाले आहेत. पारनेर बसस्थानकाजवळ ही घटना घडली.

अॅड. राहुल झावरे कार्यकर्त्यांसह गोरेगाव येथे गेले असता, सुजय विखे यांचे समर्थक प्रितेश पानमद यांच्याशी शाब्दिक चकमक होवून बाचाबाची झाली. तेथे हाणामारीही झाली. नंतर विजय औटी यांनी गोरेगाव येणाऱ्या रस्त्यालगत पारनेर बस स्थानकासमोर राहुल झावरे व त्यांच्या गाडीत असणाऱ्या कार्यकर्त्यांना मारहाण करीत गाडीची मोडतोड केली.

यानंतर निलेश लंके यांच्या समर्थकांनी माजी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या कार्यालयाची तोडफोड करत त्यांना मारहाण करण्याचा प्रवल केला. परंतु पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे विजय औटीसह त्यांचे भाऊ नंदकुमार औटी व आणखी एकास पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले.

त्यानंतर टाकळी ढोकेश्वरचे माजी सरपंच हे कामानिमित्त पारनेर तहसील कार्यालयाच्या आवारात आले असता त्यांनाही धक्काबुक्की करून त्यांच्या गाडीची मोडतोड करण्यात आली. एकंदरीतच पारनेर तालुक्यात निलेश लंके विरुद्ध विखे समर्थाकात लोकसभा निवडणुकीच्या निकालाहुन राडा सुरु झाला आहे.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, अॅड. राहुल झावरे यांची खा. निलेश लंके यांनी रुग्णालयात जावून विचारपूस केली. या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला. हल्ला करणारे हे गुन्हेगारी वृत्तीचे असून त्यांच्यावर पोलिस यंत्रणेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली,

राजकारण हा खेळ असतो, राजकारणात हार जीत होत असते, विजय आनंदाने मानायचा असतो, पराभवही पचवायचा असतो, मात्र काहींना पराभवच मान्य नाही, अशी टिका खा. लंके यांनी विखे यांच्यावर त्यांचा नामोल्लेख टाळत केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनीही घटनेचा निषेध केला. कुठल्याही निवडणुकीमध्ये यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी असतात, विजय जसा पचवला जातो तसा पराभवही पचवता आला पाहिजे. पारनेरची घटना दुर्देवी आहे,

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe