राहुरीत शिवाजीराव कर्डिले यांची डोकेदुखी वाढली, भाजपाचे माजी आमदार कदम यांची बंडाची भाषा

बीजेपी ने पुन्हा एकदा राहुरी मधून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजपाच्या या निर्णयानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षात आता नाराजी नाट्य सुरू झाले आहे.

Tejas B Shelar
Published:
Rahuri

Rahuri : विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 99 उमेदवारांचा समावेश असून अहिल्या नगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी देखील भारतीय जनता पक्षाने आपला भिडू मैदानात उतरवला आहे.

बीजेपी ने पुन्हा एकदा राहुरी मधून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजपाच्या या निर्णयानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षात आता नाराजी नाट्य सुरू झाले आहे.

भाजपा बरोबर नेहमीच एकनिष्ठ असणारे कदम पिता पुत्र यांनी शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी मिळाल्यानंतर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाचे माजी आमदार चंद्रशेखर कदम आणि त्यांचे सुपुत्र सत्यजित कदम यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली असून बंडाचा इशारा दिला आहे.

सत्यजित कदम हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपासोबत नेहमीच एकनिष्ठ राहिले आहेत. मात्र शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांचे सूर बदलले आहेत. त्यांनी राहुरी मधून पक्षाने कर्डिले यांना संधी दिल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, आपण 2019 च्या निवडणुकीत उमेदवारी मागितली होती. त्यावेळी पुढच्या वेळी नक्की उमेदवारी देणार, असे सांगून थांबवले. मात्र, आता तसं होणार नाही.

माझ्याबरोबर कार्यकर्त्यांची फौज आहे, कार्यकर्ते म्हणतील, तेच राहुरी मतदार संघात होईल, असा इशारा दिलाय. यामुळे राहुरी मध्ये भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असून शिवाजीराव कर्डिले यांच्या खेम्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

महत्त्वाचे म्हणजे येत्या दोन दिवसात सत्यजित कदम पुढील निर्णय घेणार, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार असे बोलले जात आहे. कदम यांनी कार्यकर्ते जसे सांगणार तसाच निर्णय होईल असे यावेळी स्पष्ट केले आहे.

एकंदरीत कर्डिले यांना उमेदवारी मिळाल्यानंतर माजी आमदार चंद्रशेखर कदम आणि त्यांचे सुपुत्र सत्यजित कदम हे नाराज असून त्यांनी बंडाची भाषा सुरू केली आहे. यामुळे कर्डिले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यामुळे आता कदम कुटुंब नेमकी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe