राज ठाकरे कधी संगमनेरला आलेच नाहीत ! त्यांच्याकडून संगमनेरच्या मतदारांचा अपमान – सुजय विखे पाटील

Ahmednagarlive24
Published:

Ahilyanagar Politics News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात विधानसभेतील महायुतीच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी संगमनेर मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर आश्चर्य व्यक्त करत, त्यामागे संशय असल्याचे सूचित केले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, राज ठाकरे यांनी संगमनेरच्या मतदारांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

राज ठाकरे कधी संगमनेरला आलेच नाहीत
सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “राज ठाकरे यांनी संगमनेरचा दौरा करावा आणि येथे येऊन मतदारांची मानसिकता समजून घ्यावी. त्यांनी संगमनेरच्या मतदारांबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे. हा मतदारांचा अपमान आहे.”

ते पुढे म्हणाले, “आम्ही संगमनेरमध्ये चाळीस-पन्नास हजार मताधिक्य मिळवण्याची अपेक्षा केली होती, पण ती 10 हजारांवरच राहिली. त्यामुळे राज ठाकरेंनी ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. जेव्हा ते संगमनेरला येतील, तेव्हा त्यांना त्यांचं वक्तव्य मागे घ्यावं लागेल.”

राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर वाद का ?
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात सात वेळा आमदार झाल्यानंतरही त्यांचा अचानक 10,000 मतांनी पराभव कसा झाला? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्याने महायुतीच्या विजयावर शंका घेतल्याचे स्पष्ट होत होते.

प्रयागराज घटनेवरून काँग्रेसवर निशाणा
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयागराज घटनेवर बोलण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना सुजय विखे म्हणाले, “प्रयागराजच्या घटनेचा हिंदू धर्माशी काही संबंध नाही. हिंदू जागृत होत आहेत, हेच या घटनेतून स्पष्ट होते. कुंभमेळ्यात याआधी एवढी गर्दी कधीच नव्हती.

यंदा ती अधिक झाली आणि त्यामुळे नियोजन कोलमडले. ही घटना दुर्दैवी आहे, पण काँग्रेस तिचं राजकारण करत आहे.”विखेंनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत पुढे सांगितले, “जर काँग्रेसला वाटत असेल की अशा वक्तव्यांमुळे हिंदू मतं मिळतील, तर हा त्यांचा मोठा गैरसमज आहे.”

संगमनेरमध्ये महायुतीच्या विजयावरून राजकीय संघर्ष वाढणार
संगमनेरच्या निवडणुकीच्या निकालानंतर विरोधक आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे या वादाला नवा आयाम मिळाला आहे. आगामी काळात राज ठाकरे संगमनेर दौरा करतात का, आणि त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe