मुंबईमध्ये आयोजित मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालांवर तीव्र शंका उपस्थित केली. त्यांनी विशेषतः काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या अनपेक्षित पराभवावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच संशय व्यक्त केला. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही जोरदार टीका करत, त्यांच्या विजयाची गणिते संशयास्पद असल्याचे स्पष्ट केले.
थोरात कसे पराभूत झाले ?
राज ठाकरे म्हणाले, “बाळासाहेब थोरात हे नेहमीच मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत. ७० ते ८० हजार मताधिक्याने जिंकणारे थोरात यंदा अवघ्या १० हजार मतांनी पराभूत झाले, हे शक्य आहे का?” त्यांनी यावर जोर देत सांगितले की, ही निवडणूक लोकशाहीसाठी धोकादायक असून, लोकांनी दिलेली मते कुठेतरी गायब झाल्याचा संशय असल्याचे त्यांनी सूचित केले.
त्यांनी आणखी एक उदाहरण देताना सांगितले की, “राजू पाटील यांना त्यांच्याच गावी एकही मत का मिळाले नाही? लोकांनी मतदान तर नक्कीच केले, पण त्याचे निकाल वेगळेच दिसत आहेत.”
पवारांचा विजय संशयास्पद
राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करत सांगितले की, “लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ८ खासदार निवडून आले. मात्र, काहीच महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या केवळ १० आमदार निवडून आले. याउलट, लोकसभेला अजित पवार गटाचा केवळ १ खासदार निवडून आला होता, पण अवघ्या चारच महिन्यांत त्यांचे तब्बल ४२ आमदार निवडून कसे आले?” हा प्रकार संपूर्णपणे संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले.
ईव्हीएम घोटाळ्याचा प्रश्न
राज ठाकरे यांनी थेट ईव्हीएम घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, “लोकांनी मतदान तर केले, पण त्यांची मते नक्की कुठे गेली?” हा प्रश्न अत्यंत गंभीर असून, मतमोजणी प्रक्रियेत हस्तक्षेप झाला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
त्यांनी असेही सांगितले की, “शरद पवारांनी छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांना मोठे केले. मात्र, आता त्यांच्या पक्षाचा संपूर्ण पराभव होतो? हे कसे शक्य आहे?” त्यांनी थेट निवडणूक प्रक्रियेवर संशय उपस्थित करत या संपूर्ण निवडणुकीच्या पारदर्शकतेची चौकशी करण्याची गरज असल्याचे म्हटले.