Ahmednagar Politics : संपदा नागरी सहकारी पतसंस्थेतील घोटाळा महाराष्ट्रभर गाजला. त्यानंतर यातील काही आरोपीना जन्मठेप झाली तर काहींना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा झाल्या. पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी जन्मठेप होणे हा अहमदनगरधील पहिलाच प्रकार घडला,
त्यामुळे हा निकालही जास्त गाजला. दरम्यान आता या संपदा गैरव्यवहारावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरही त्यांचे नाव न घेता हल्लाबोल केला.
१३.३८ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्यांना कुणाचा राजाश्रय ? ते तुरुंगात आणि तुरुंगातून पडल्यावर कुणाच्या गाडीत फिरत होता? त्याचा खुलासा पाहिजे असे म्हणत त्यांनी घणाघात केला. नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले मंत्री विखे?
१३.३८ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्यांना कुणाचा राजाश्रय होता ? तो त्यांच्या गळ्यातील ताइद होता. प्रतिमंत्री म्हणून तो वावरत होता. लोक विसरणार नाहीत.
भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालणे हा समाजाचा विश्वासघात आहे. लाखों ठेवीदार वाऱ्यावर पडले आहेत. यावर माजी मंत्री मौनी बाबांची भूमिका काय आहे? असा सवाल केला. तुमच्याकडे पाहून लोकांनी तेथे पैसे गुंतवले.
आता त्या पैशांची गॅरंटी तुम्ही घेतली पाहिजे, अशी मागणी केली. दरम्यान त्यांच्या या टीकेनंतर काही मीडिया प्रतिनिधींनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या स्वीय सहायकांशी संपर्क करत प्रतिक्रिया विचारली असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
जिल्ह्यात गुंडाराज निर्माण होतेय
खासदार सुजय विखे यांना दिलेल्या धमकीबाबत राधाकृष्ण विखे म्हणाले, जिल्ह्यात गुंडाराज निर्माण होत आहे. त्याची दखल पोलीस घेतील. विखे विरोधात प्रचार करणे हा त्यांचा धर्म आहे, असे शरद पवार यांचे नाव न घेता त्यांनी सांगितले.