महाराष्ट्रात मराठा आंदोलन चांगलेच तापले आहे. राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील आता आंदोलनास पाठिंबा देण्यास सुरवात केली आहे. मंत्रिमंडळ बैठक, राजकीय चर्चा यांचा काहीच परिणाम होत नसल्याने आता दिल्लीत केंद्रीय पातळीवर याबाबत हालचाली सुरु झाल्याचे वृत्त आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता ऍक्टिव्ह होण्याची शक्यता वर्तवली जातेय. अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्लीत बोलावल असून दिल्लीतील निवासस्थानी दुपारी ३.३० वाजता हे दोघेही जाणार आहेत. यांत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होईल असे सूत्रांकडून कळते.

राज्याच्या काही भागात मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी राजकीय नेत्यांची घरे जाळली. त्यानंतर अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली.
यानंतर राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊन मराठा आरक्षण आंदोलन शमवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, मराठा चळवळीतील प्रमुख चेहरा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला. मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली होती.
त्यानंतर अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्लीला बोलावलं. आता मराठा आरक्षण आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांना काही सूचना देतात का? की ते स्वतः यात ऍक्टिव्ह होतात? याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.
राज्य सरकारचे शिष्टमंडळ आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्नशील
दरम्यान आता राज्य सरकारचे शिष्टमंडळ उद्या अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे. उपोषण सोडावे व आरक्षणासाठी राज्य सरकारला आणखी वेळ द्यावा अशी चर्चा हे शिष्ट मंडळ करणार आहे.