Ahmednagar Politics : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अनेकांनी पक्षांतर्गत बंड उभारत आपली वेगळी भूमिका जाहीर केली आहे. विशेष म्हणजे प्रत्येकच पक्षात अशा घटना घडत आहेत. गेल्या वर्षी शिवसेनेत उभी फूट पडली. उबाठा शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट शिवसेना असे दोन गट शिवसेनेत पडले.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी फूट पडली. अजित पवार यांचा गट आणि शरदचंद्र पवार यांचा गट असे दोन गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही पडलेत. विशेष म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, काँग्रेसने ज्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवले ते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष बाब म्हणजे भाजपामध्ये गृह प्रवेश केल्यानंतर त्यांना मोठी भेटही मिळाली आहे. भाजपाने त्यांना राज्यसभेच्या खासदारकीची उमेदवारी देखील बहाल केली आहे. दरम्यान याच संदर्भात राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी नाव न घेता अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस मधील बाळासाहेब थोरात यांना टार्गेट केले आहे.
खरेतर महसूल मंत्री विखे पाटील हे देखील आधी काँग्रेसमध्येच होते. 2019 पर्यंत त्यांनी काँग्रेससोबत राजकीय प्रवास सुरू ठेवला. मात्र 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपामध्ये एंट्री केली. विशेष म्हणजे भाजपामध्ये आल्यानंतर त्यांचा भाजपाने यथायोग्य गौरवही केला आहे.
सध्या ते गृहमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे कामकाज पाहत आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत महसूल मंत्री विखे पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी नाव न घेता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्ला चढवला आहे. त्यांनी थोरात यांना उपरोधिक टोला लगावला आहे.
विखे पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे, “भाजपमध्ये कुणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असते. यात काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली आहे. मात्र नगर जिल्ह्यातील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात”, असं म्हणत विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला आहे. मात्र त्यांनी असे बोलताना कोणाचेही नाव घेतले नाही.
तथापि, त्यांनी बाळासाहेब थोरात यांनाच उद्देशून हे म्हटले आहे. यामुळे सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर आणखी मोठी उलथापालथ होणार का ? अशा चर्चा पाहायाला मिळत आहेत. अहमदनगर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात खरंच भाजपाच्या वाटेवर आहेत का ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.