शिर्डीतील श्री साईबाबा इंटरनॅशनल विमानतळावर बहुप्रतिक्षित ‘नाईट लँडिंग’ सेवेला अखेर प्रारंभ झाला आहे. महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पहिल्या विमानाचे रात्रीच्या वेळी यशस्वीपणे लँडिंग करण्यात आले. या ऐतिहासिक घटनेमुळे शिर्डी आणि आसपासच्या भागातील विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शिर्डी विमानतळावर रात्रीची विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून होत होती. या मागणीची दखल घेत महायुती सरकारने याबाबत त्वरित निर्णय घेतला होता. अखेर गुढीपाडव्याला सरकारच्या या आश्वासनाची पूर्तता झाली आणि विमानतळावर पहिल्या रात्रीच्या विमानाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी माजी खासदार सुजय विखे पाटील उपस्थित होते. त्यांनी प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नाशिकमध्ये कुंभमेळा होणार असल्यामुळे शिर्डी विमानतळ संपूर्ण विमान उद्योगाचे केंद्र बनेल, असा आमचा प्रयत्न आहे, असे विखे पाटील म्हणाले. तसेच, नवीन विमानतळ लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, शिर्डी विमानतळ ५०० कोटी रुपये खर्चून बांधले जाणार असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल. या विमानतळावर किमान चार ते पाच एरो ब्रिजची सुविधा असेल. आमचा प्रयत्न आहे की, हे नवीन विमानतळ २०२७ पूर्वी पूर्ण होईल,
ज्यामुळे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल. या संदर्भात पुढील आठवड्यात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे विमानतळ दोन वर्षांत पूर्ण करू, असा विश्वासही विखे पाटील यांनी व्यक्त केला.
पहिल्या नाईट लँडिंगसाठी विमानतळावर खास तयारी करण्यात आली होती. विमान उतरल्यावर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी विमानतळावर विशेष रोषणाई आणि सजावटही करण्यात आली होती.
नाईट लँडिंग सेवेच्या प्रारंभामुळे शिर्डीला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढेल आणि पर्यटनाला मोठा चालना मिळेल, असे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे. यामुळे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होईलच, शिवाय आर्थिक व व्यावसायिक विकासालाही चालना मिळेल.
सदर सेवेच्या प्रारंभामुळे स्थानिक रहिवाशांनी आनंद व्यक्त केला असून सरकारचे आभार मानले आहेत.