माफीयाराजला पाठबळ.. ठेकेदारी पोसली..! संगमनेरात जुंपली, आ. खताळ यांनी आता थोरातांच सगळंच काढलं

Published on -

ठेकेदारी संस्‍कृती आणि माफीयाराजला पाठबळ देणाऱ्यांनी चाळीस वर्षात जनतेच्‍या प्रश्‍नांची उत्तरे दिली नाहीत. त्‍यांच्‍या प्रश्‍नांची उत्‍तर फक्‍त ठेकेदारी मध्‍येच गुंतलेली होती. वर्षानुवर्षे या तालुक्‍याचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. आता कुठेतरी तालुक्‍याला स्‍वातंत्र्य मिळालेले आहे. जनता मोकळा श्‍वास घेवू लागली आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्‍या बैठकीवर टिका करण्‍यापेक्षा चाळीस वर्ष आपण काय केले याचे आत्‍मपरिक्षण करा, नव्‍या विकास प्रक्रीयेत खोडा घालण्‍याचे काम करु नका असा खोचक सल्‍ला आमदार अमोल खताळ यांनी माध्यमाना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे यांनी संगमनेर मध्‍ये घेतलेल्‍या बैठकीवर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्‍या टिकेला उत्‍तर देताना आ.खताळ म्‍हणाले की, चाळीस वर्ष ज्‍यांना कोणताच प्रश्‍न सोडविता आला नाही, ज्‍यांचे प्रश्‍न फक्‍त ठेकेदार आणि माफीयांशी गुंतलेले होते त्‍यांनी पालकमंत्र्यांनी घेतलेल्‍या पहिल्‍याच बैठकीत उत्‍तरांची अपेक्षा करावी हे अत्‍यंत दुर्दैवी आहे.

सरकारला येवून फक्‍त शंभर दिवस झाले आहेत, तुम्‍ही तर चाळीस वर्ष सत्‍तेत होता तरीही संगमनेर शहराला प्रदूषित पाणी प्‍यावे लागत आहे. तालुक्‍यातील जनता अजुनही तहानलेली आहे. ग्रामीण भागात अद्यापही तुमच्‍या नाकर्तेपणमुळे टॅंकर सुरु आहेत. चाळीस वर्षात साधा दशक्रीया विधीचा घाटही तुम्‍हाला बांधता आला नाही. युवकांच्‍या रोजगाराच्‍या संधी निर्माण करु शकला नाहीत. त्‍यांनी आता लगेच प्रश्‍नांची उत्‍तर मागणे म्‍हणजे स्‍वत:चे अपयश उघड करण्‍यासारखे असल्‍याची टिका आ.खताळ.

पालकमंत्र्यांनी घेतलेल्‍या बैठकीत तालुक्‍याच्‍या विजेच्‍या प्रश्‍नासह पाणी योजनांची कामे निर्धारित वेळेत मार्गी लावण्‍याच्‍या सुचना देण्‍यात आल्‍या आहेत. तालुक्‍याची ठप्‍प झालेली विकास प्रक्रीया पुन्‍हा एकदा या बैठकांमुळे गतिमान झाली असून, दहशत संपल्‍यामुळे तालुक्‍यातील सामान्‍य माणूस आता विकास कामांसाठी पुढे आला आहे. विधानसभा निवडणूकीत सामान्‍य जनतेने घडविलेल्‍या परिवर्तनामुळेच तालुक्‍याला स्‍वातंत्र्य‍ मिळाले असून, तालुका आता मोकळा श्‍वास घ्‍यायला लागला आहे. हे ज्‍यांना पाहवत नाही ते फक्‍त आता सुरु असलेल्‍या विकास प्रक्रीयेवर टिका करण्‍याचे काम करीत आहे.

यापूर्वी बाह्यशक्‍ती म्‍हणून तुमची टिका असायची, परंतू विधानसभा निवडणूकीत तर तालुक्‍यातील जनतेनेच तुमचा पराभव केला आहे. याचा विचार करा, तुमच्या पायाखालची वाळू सरकल्‍यामुळेच कारखान्‍याच्‍या सभासदांना तीस किलो साखर देण्‍याची घोषणा तुम्‍हाला करावी लागली. यापूर्वी कधी सभासदांसाठी असा निर्णय झाला नव्‍हता. याचाच अर्थ सोयीनुसार तालुक्‍यातील जनतेला वापरुन घ्‍यायचे हे धोरण आता सर्वांच्‍या लक्षात आले आहे.

सत्‍ता गेल्‍यानंतर वैफल्‍यग्रस्‍त तुम्‍ही झालेले आहात. राजकीय अस्तित्‍वसाठी कुठला जरी निर्णय घेतला तरी, त्‍यातला ढोंगीपणा आता उघड होत आहे. तुमच्‍या प्रत्‍येक निर्णयाचे विडंबन आता जनता करत आहे. त्‍यामुळे झालेला पराभव मान्‍य करा, तालुक्‍याच्‍या नव्‍या विकास पर्वाला आडवे येवून खोडा घालू नका असा इशारा आ.खताळ यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe