माझे वडील लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) १९६२ पासून अखेरपर्यंत सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष या पदावर नऊ वर्षे राहिल्यानंतर १९७१ ते २००९ या संपूर्ण काळात ते संसदीय राजकारणातच सक्रिय होते. त्यांचे राजकारण-समाजकारणाचे प्रमुख कार्यक्षेत्रही तेच राहिले.
माझे आजोबा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे जीवन आणि कार्य; तर दुसऱ्या बाजूला संसदेत होणाऱ्या चर्चा, तेथे उपस्थित होणारे विविध प्रश्न, देशातील बहुसांस्कृतिकता, देशाच्या कानाकोपऱ्यातून संसदेत आलेल्या प्रतिनिधींचे विचार, आंतरराष्ट्रीय राजकारण, या संदर्भात देशाची भूमिका आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चा-घडामोडी या सर्वांच्या प्रभावातून त्यांचे राजकीय व्यक्तिमत्त्व तयार झाले होते.

भांडवलशाही आणि साम्यवादी अशा दोन्हीही अर्थव्यवस्था त्याकाळी प्रचलित असताना मानवतावादी आणि व्यक्तीला प्रतिष्ठा देणारी ‘सहकार’ ही व्यवस्था लोणी-प्रवरानगर येथे विसाव्या शतकाच्या मध्यात स्थापित झाली होती. यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी या विचाराला संस्थात्मक कार्याची जोड दिली. शेती, सहकार, शिक्षण, जलसिंचन, आरोग्य या क्षेत्रांत आणि शेतकरी, शेतमजूर, मजूर, महिला, बेरोजगार, आदिवासी या घटकांच्या विकासासाठी ते जीवनभर नव्या-नव्या वाटा शोधत राहिले.
अहमदनगर जिल्हा हा सह्याद्रीच्या पर्जन्यछायेत असल्याने कायम दुष्काळी म्हणूनच गणला जात असे. भंडारदरा धरणाने काही प्रमाणात सिंचनाची व्यवस्था झाली असली, तरी उर्वरित भागात पाण्याचे नेहमीच दुर्भीक्ष्य होते. जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष झाल्यापासूनच त्यांना या समस्येची जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी त्याकाळी जिल्ह्यात सर्वत्र शेकडो पाझर तलाव बांधले. पुढे निळवंडे धरणासाठी केलेला संघर्ष हाही त्याचाच भाग होता. या समस्येला अधिक शास्त्रीय आणि सैद्धांतिक रितीने सामोरे जाण्यासाठी त्यांनी १९९१ मध्ये महाराष्ट्र पाणी परिषदेची स्थापना केली.
या माध्यमातून आदरणीय गणपतराव देशमुख आणि महाराष्ट्रातील विविध जलतज्ज्ञांशी विचारविनिमय करून संपूर्ण महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्थेचा सर्वांगीण अभ्यास केला. मुळा-प्रवरा, गोदावरी, तापी, कृष्णा, भीमा इत्यादी नद्या एकमेकींशी जोडल्या आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडील नद्यांच्या खोऱ्यात वळविले, तर महाराष्ट्राची किती सिंचनक्षमता वाढेल याचा या परिषदेने शास्त्रीय अभ्यास केला. त्यानुसार राज्य आणि केंद्र सरकारकडे याविषयी सातत्याने आग्रह धरला. यासंबंधीचे विविध प्रस्ताव अनेकदा केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठविले.
या समस्येचे गांभीर्य सर्व मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळेच केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पाची महाराष्ट्राकडे पाहण्याची भूमिका बदलली आणि राज्य सरकारने सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पाणी पूर्वेकडे वळविण्याचे धोरण घेतले. यामागे त्यांचे गेल्या पन्नास वर्षापासूनचे अथक प्रयत्न आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.
संसदेत असतानाही ते याच घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करीत राहिले. राष्ट्रीय राजकारणात राहूनही स्थानिक पातळीवरील समस्यांचा त्यांना कधीही विसर पडला नाही. आपण समाजाशी जोडलेले असले पाहिजे, आपण समाजाचे देणे लागतो, विविध समाजघटकांना न्याय देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, ती यशस्वीरित्या निभावली पाहिजे, हीच त्यांची धारणा होती. त्यासाठी पक्षीय राजकारणाच्या चौकटी मोडण्याची वेळ आली, तरी ते आपल्या सामाजिक भूमिकेपासून कधीही ढळले नाही. त्याची त्यांना किंमतही मोजावी लागली. परंतु सामाजिक बांधिलकी जपणे हेच आपले प्रमुख कर्तव्य आहे, अशी त्यांची ठाम भूमिका होती.
सार्वजनिक जीवनातील या सर्व कालखंडात त्यांना जे अनुभव आले, ते त्यांनी ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्रा मध्ये विस्ताराने विशद केले आहेत. हे अनुभव व्यक्तिगत असले, तरी लोकनेत्याचे जीवन हे सार्वजनिकच असते. या अर्थाने सार्वजनिक जीवनात सक्रिय राहिलेल्या एका लोकनेत्याचे ते अर्ध्या शतकातील अनुभव आहेत. स्वातंत्र्या नंतरचा हा काळ अनेक घटना-घडामोडींनी भरलेला आहे. या सर्वांचे संदर्भ या ग्रंथात आले आहेत. या दृष्टीने हा ग्रंथ सामाजिक दस्तऐवजही म्हणता येईल.
म्हणून त्याचे प्रकाशन सार्वजनिक क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या हस्ते व्हावे, अशी माझी आणि सर्व कार्यकर्त्यांचीही इच्छा होती. त्यासाठी आम्ही पुष्कळ प्रयत्न केले, परंतु अखेरच्या काळात त्यांची तब्येत अनपेक्षितरित्या अचानक खालावत गेली. अशाही परिस्थितीत आम्ही धावपळ करून ५ जानेवारी २०१७रोजी प्रकाशन समारंभाचे नियोजनही केले होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. या ग्रंथाचे औपचारिक प्रकाशन होण्यापूर्वीच दिनांक ३० डिसेंबर २०१६ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तो आम्हा सर्व प्रवरावासीयांसाठी अनपेक्षित धक्का होता. त्यातून आम्ही पुढे पुष्कळ दिवस स्वतःला सावरू शकलो नाही.
त्यानंतर देशात ‘कोविड’ या जागतिक महामारीचे संकट आले. त्यातही आणखी काही दिवस गेले. शेवटी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ग्रंथाचे १३ ऑक्टोबर २०२० रोजी (ऑनलाइन) प्रकाशन झाले. त्यावेळी पंतप्रधानांनी त्यांच्या कार्याचा मुक्तकंठाने गौरव केला. ते म्हणाले, “स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या जीवनाचे विविध पैलू मीही जवळून अनुभवले आहेत. ते वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत समाजकारणात काम करीत राहिले. केंद्रात मंत्री असताना त्यांनी सामान्य शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सतत काम केले. देशात सहकार चळवळ रुजावी, यासाठी प्रयत्न करीत राहिले. शेती आणि जलविकासासाठी त्यांचे काम पुढील पिढीस आदर्श ठरणारे आहे.” असे त्यांनी गौरवोद्गार काढले.
भारतीय लोकशाहीत आणि संसदीय राजकारणात पन्नास वर्षांहून अधिक काळ सक्रीय राहिलेल्या लोकनेत्याचे हे आत्मचरित्र आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य माणसांनाही त्यांचे अनुभव मार्गदर्शक ठरणारे आणि इतिहासाचा मागोवा घेत भविष्याचा वेध घेण्यासाठीही उपयुक्त ठरणारे आहेत, असे मला वाटते. या ग्रंथाच्या तीन हजार प्रती संपल्या आणि महाराष्ट्रातून अनेकांकडून या ग्रंथासंबंधी मला विचारणा होत होती, म्हणून या ग्रंथाची नवी आवृत्ती काढण्याचे ठरविले. त्यासाठी राजहंस प्रकाशन आणि मा. दिलीप माजगावकर यांनी पुढाकार घेतला, याचा मला आनंद आहे. राजहंस परिवाराशी आमचे घनिष्ट नाते आहे. वैचारिक संक्रमणाच्या या काळात काही मूलभूत असे समाजापर्यंत पोहोचविण्याच्या या कामात त्यांचेही योगदान मोलाचे असेल, असे मला वाटते. मी त्यांना धन्यवाद देतो आणि वाचक आमच्या या प्रयत्नाचे स्वागत करतील, अशी अशा बाळगतो.
धन्यवाद…
डॉ.राधाकृष्ण विखे पाटील
(मंत्री, जलसंपदा तथा पालकमंत्री, अहिल्यानगर)