संगमनेर तालुक्यामध्ये निळवंडेच्या पाण्यावरून रणकंदन पेटले आहे. पोलिसांनी पहिले आम्हाला गोळ्या घाला, मग पाणी कुठे घेऊन जायचे तिकडे घेऊन जा, अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. निमगाव बुद्रुक येथे शेतकऱ्यांचा मोठा जमाव जमा झाला होता. राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील येथे आल्या आहेत. निळवंडे उजवा कालव्याचे उप विभागीय अभियंता प्रमोद माने यांच्यासह विविध अधिकारीही यावेळी उपस्थित झालेले आहेत.
निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी घेण्यासाठी टाकलेले पाईप काढण्यासाठी जलसंपदा विभागाकडून पोलीस बाळाचा वापर करून धाक निर्माण केला जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी लाभधारक शेतकरी आणि प्रशासन आमने सामने आले आहे. त्यामुळे संगमनेर मध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
उन्हाळा तीव्र झाल्यामुळे शेतीसाठी आणि वापरासाठी पाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. त्यात चाऱ्यांची कामे पूर्ण झालेली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कालव्यात पाईप टाकून पाणी घेण्यास सुरुवात केली आहे.

दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हे पाईप फोडून टाकले होते. त्या विरोधात भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यासह 500 शेतकऱ्यांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केले. अखेर जलसंपदा विभागाने लेखी देऊन पाईप फोडणार नसल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात जलसंपदा विभागाने आपला शब्द फिरवला आहे. आज पोलीस बाळासह जलसंपदा विभागाचे अधिकारी निमगाव बुद्रुक येथे दाखल झाले. शेतकऱ्यांचाही मोठा जमाव याठिकाणी जमला. शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची अक्षरशा त्रेधातिरपीट उडाली.
शेतकऱ्यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, राहुरी तालुक्यात कालव्यांचे क्षेत्र 16 किलोमीटर आहे. त्या 16 किलोमीटर साठी तुम्ही वीस दिवस पाणी देणार आहात तर संगमनेर तालुक्यात तिप्पट म्हणजे 48 किलोमीटरचे क्षेत्र आहे त्याला तुम्ही साठ दिवस पाणी देणार आहात का ? त्यावर अधिकाऱ्यांनी आम्ही वीस दिवस पाणी देऊ असे सांगितले. त्यामुळे जनतेचा संताप अनावर झाला. निळवंडे धरण आणि कालवे व्हावे यासाठी संगमनेर तालुक्याचे लोकनेते बाळासाहेब थोरात आणि जनतेने पुढाकार घेतला.
स्वतःच्या जमिनी दिल्या, नागरिकांचे पुनर्वसन करून घेण्यात हातभार लावला. त्या पाण्यावर नैसर्गिकरित्या पहिला हक्क असताना, आमच्या सोबतच हा अन्याय तुम्ही नेमका कोणाच्या सांगण्यावरून करत आहात? असाही परखड सवाल जनतेने यावेळी विचारला.
संगमनेर तालुक्याच्या उजवा कालवा लाभक्षेत्रावरील विविध गावांमध्ये यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत, पोलिसांनी देखील ही परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाची अतिरिक्त कुमुक मागविल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी निमगाव बुद्रुक येथील शेकडो शेतकऱ्यांसह कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात उपस्थित होते.
आम्हाला गोळ्या घाला मग पाणी घेऊन जा
आमच्या हक्काचे पाणी वाहून चालले आहे. आम्ही फक्त बघत आहोत. जमिनी आमच्या गेल्या, आम्ही भूमीहीन झालो. 400 रुपये गुंठ्याने आमच्या जमिनी घेतल्या. हे पाणी आमच्या हक्काचे आहे, प्रशासनाने जबरदस्ती केली तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्हाला गोळ्या घाला, मात्र आम्ही ऐकणार नाही. आमच्या हक्काचे पाणी, हिशेबाने आम्हाला मिळाले पाहिजे.
– शिवाजी वलवे, सरपंच, मिर्झापूर
… अन्यथा जलसमाधी घेऊ
शासनाने आमचा अंत पाहू नये. पाणी काढणे ही कठीण प्रक्रिया आहे. एका पाईपमध्ये पाणी भरायला चार तास लागतात. त्यात पाणी कमी झाले की पुन्हा पुन्हा भरावे लागते. शेतकऱ्यांना आदबून मारायचे प्रशासनाने ठरवले आहे का? जलसंपदा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकदा फिल्डवर या, एका पाईपात पाणी भरून दाखवा. आमचा हक्क तुम्ही डावालणार असाल, तर आम्ही सर्व शेतकरी इथेच जलसमाधी घेऊ.
– अरुण गुंजाळ, उपसरपंच, निमज