एक दिवस शिवरायांच्या गड, कल्ले आणि दुर्गांसाठी या खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतील मोहिमेचा रविवारी शिवनेरीच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेउन शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, खासदार नीलेश लंके यांच्या आवाहनानंतर या मोहिमेस शिवप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला.
राज्यातील धार्मिकता, एकता, अखंडता बंधुत्वास कुठेतरी बाधा पोहचत असल्याचे सध्या चित्र आहे. अनेक राजकीय मंडळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभुमीवर खासदार नीलेश लंके हे अठरापगड जातीच्या मावळयांना एकत्र करून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. या मोहिमेचा रविवारी शिवजन्मभुमी शिवनेरी येथे प्रारंभ करण्यात आला.

मुस्लिम बांधवांचाही सहभाग
खासदार नीलेश लंके यांनी अठरापगड जातीच्या मावळयांना सोबत घेत शिवनेरीवर स्वच्छता मोहिम राबविली. पवित्र रमजानचे रोजे असतानाही मुस्लिम बांधवांनी या मोहिमेत खा. लंके यांच्या खांद्याला खांदा लावत आले योगदान दिले.
शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर शुभारंभ
सोमवारी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या पार्श्वभुमीवर आम्ही सर्व शिवभक्तांनी निर्धार केला आहे की प्रत्येक महिन्याच्या रविवारी छत्रपतींच्या गड किल्ल्ल्यांच्या संवर्धनासाठी द्यावा. याच निर्धाराने आम्ही आज शिवनेरीवर आलेलो आहोत.
दोन दिवसांत शेकडोंचा सहभाग
दोन दिवसांपूर्वी ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास आठशे ते नऊशे लोकांचा प्रतिसाद मिळाला. नावनोंदणी व्यतिरिक्त अनेक शिवभक्त आज इथे हजर झाले होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिवभक्त त्यांच्या मुलांना घेऊन या मोहिमेत सहभागी झाले आहेत. मुंबई, ठाणे, सातारा, तुळजापूर, धाराशिव, नाशिक, पुणे आदी वेगवेगळया भागांतून या ठिकाणी अनेक शिवभक्त आल्याचे पहावयास मिळाले – खा. नीलेश लंके
सर्वधर्मीयांचा सहभाग
जाती धर्मापलीकडे जाऊन विविध जाती धर्माचे लोक या मोहिमेत सहभागी झाले आहेत यासंदर्भात स्पष्टीकरण देताना खा. लंके म्हणाले, छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. अखंड हिंदुस्तानमध्ये एकमेव शिवछत्रपती शिवाजी महाराज होउन गेले. आठरापगड जातींना बरोबर घेऊन चालणारा राजा म्हणून त्यांची ओळख आहे. आम्ही छत्रपती शिवरायांचे हिंदुत्व माणणारे आहोत. त्याच शिवरायांच्या गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी रमजानचा सण असताना, त्यांचा रोजा असतानाही मुस्लिम बांधवही या मोहिमेत सहभागी झाले असल्याचे खा. लंके म्हणाले.
राजकीय स्टंट नाही
मी शिवरायांचा मावळा आहे, त्यामुळे ही मोहिम म्हणजे कोणताही राजकीय स्टंट नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व मावळयांनी राबविलेली स्वच्छता मोहिम आहे. या मोहिमेमागे कोणताही राजकीय हेतू असण्याचे कारणच नाही. ही मोहिम कोणास उत्तर देण्यासाठी किंवा कोणतीही राजकीय टिका टिपन्नी करण्यासाठी नाही. केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा समृध्द इतिहास आणि वारसा जतन व्हावा, तो जनतेला कळावा हाच या स्वच्छता मोहिमेमागचा हेतू आहे.
खासदार नीलेश लंके , लोकसभा सदस्य
लोकवर्गणीतून स्वच्छता
स्वच्छता मोहिमेबरोबरच गड किल्ल्यांची डागडुजी, जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी लागणारा खर्च हा लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे. श्रमदान करतानाच गड, किल्ले तसेच दुर्गांच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाकडे निधीची मागणी करण्यात येणार असल्याचे खा. लंके यांनी सांगितलें.
पुढील मोहिम धर्मवीर गडावर
पुढील स्वच्छता मोहिम अहिल्यानगर जिल्हयातील श्रीगोंदे तालुक्यातील धर्मवीर गडावर रविवार दि. १३ एप्रिल रोजी होणार असल्याचे यावेळी खासदार नीलेश लंके यांनी यावेळी जाहिर केले.
वन विभागाला डस्ट बिन
खासदार नीलेश लंके यांच्यासह त्यांचे सहकारी या मोहिमेत खोरे, टिकाव, कुऱ्हाड, डस्टबिन, बादली, झाडांच्या बुंध्याला लावण्यासाठीचे रंग सोबत घेत सहभागी झाले होते. यावेळी वन विभागाला नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने डस्टबिन भेट देण्यात आले.