Ahilyanagar News : संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळेस 70,000 पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणारे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा झालेला पराभव हे राज्यातील मोठे आश्चर्य असल्याचे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासह राज्यातील विधानसभा निवडणूक निकालावर शंका व्यक्त केली आहे. याचबरोबर विधानसभेचा निकाल हा जनतेला न पटणारा आणि अनपेक्षित असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
मुंबई येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ,लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या चारच महिन्यात विधानसभेत असा निकाल कसा लागू शकतो. हा मोठा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. महाराष्ट्रातून सलग आठ वेळेस काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे 70 हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले. सतत काम करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे .सातत्याने जनतेमध्ये आहे. स्वच्छ प्रतिमा आहे. मतदारसंघात मोठी विकास कामे मार्गी लावली आहे. अगदी विरोधक सुद्धा ज्या नेतृत्वाचा आदर करतात असे बाळासाहेब थोरात यांचा पराभव हे कसं शक्य आहे असे ते म्हणाले.

याबाबत थोरात कारखाना येथे माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विधानसभेच्या निकालाबाची शंका अगदी बरोबर आहे. विधानसभेचा निकाल हा अनाकलनीय आणि अनपेक्षित आहे. आपण सलग आठ वेळेस 50 हजार पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलो. विधानसभा मतदारसंघाची बांधणी चांगली आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. विकास कामे झाली आहे. मी आणि जनता ही विजयाबाबत ठाम होती. मात्र घडले विपरीतच. या निकालाबाबत जनमाणसांमध्ये आज सुद्धा मोठी शंका आहे.
महाराष्ट्रात आणि देशातही विधानसभेच्या निवडणुकीबाबत संशय आहे. ईव्हीएम बाबत शंका येणे सहाजिकच आहे. ईव्हीएम बाबत माहिती नागरिकांना पुरवली जात नाही .कायदा आणि नियम करून माहिती देणे बंद केले आहे. व्हीव्हीपॅट मोजणीची मागणी असताना सुद्धा चिठ्ठ्यांची मोजणी केली जात नाही. फक्त त्या मशीनची मॉकड्रिल करणार आहेत .आणि त्याचा काही उपयोग नाही.याशिवाय राज्यभरात 48 लाख मतदार वाढले कसे हे संशयास्पद आहे .याबाबत निवडणूक आयोगाला उत्तर देता आले नाही. आता खरी लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे
ईव्हीएम बाबत राज ठाकरे यांची भूमिका अगदी बरोबर असून जनता सुद्धा ईव्हीएमच्या विरोधात ठाम आहे .दिल्लीतील निवडणूक आयोग कोणाच्यातरी दबावाखाली काम करत असल्याने समाधानकारक उत्तर देऊ शकत नाही. कुणीतरी स्वायत्त संस्था संपून टाकण्याचे काम करत आहे. आणि म्हणून देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांना एकत्रितपणे लढा द्यावा लागणार आहे .
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यातील अनेक जण भाजपबरोबर गेले आहेत.राजकारण हे जनतेच्या विकासासाठी तत्त्वाने करायचे असते मात्र आता राजकारणात तत्व राहिली नाही. जनतेने काय ते समजून घ्यावे .कोण मतलबी आहे, कोण सत्तेसाठी राजकारण करतो आहे हे जनतेनेच ओळखावे असेही राज्यातील वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.