अहमदनगर जिल्ह्यातील महापालिकेची पुढील महिन्यात अर्थात ३१ डिसेंबरला मुदत संपत आहे. परंतु सध्याची स्थिती पाहता महापालिकेची निवडणूक आता लगेच काही होणार नाही. त्यामुळे आता अहमदनगर महापालिकेवर प्रशासक राज येईल. मागील दीड वर्षांपासून नगरची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासक आहे. आता महापालिकेतही प्रशासक राज येईल परंतु यामुळे अनेकांची राजकीय गणिते जुळण्यात अडचणी येतील.
राज्यात महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का रखडल्या ?

सुरवातीला कोरोना काळात या निवडणूक थांबवल्या होत्या. परंतु त्यानंतर आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणूक थांबल्या आहेत. इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण (ओबीसी) यावर आक्षेप घेण्यात आल्याने आता हे आरक्षण किती असावे,
या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अद्याप याचा निकाल लागलेला नाही. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीची उद्या (२८ नोव्हेंबर) तारीख जरी असली तरी मागील काही अनुभव पाहता पुढील तारीख मिळताना दिसत आहे.
निवडणूक न होण्याचं आणखी एक कारण म्हणजे राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांतील सदस्य संख्या वाढवली व त्यानुसार गट-गण आणि प्रभाग रचना तसेच आरक्षण निश्चित त्यांनी केले होते.
परंतु राज्यात महायुती सरकार आलं आणि हा निर्णय स्थगित केला. त्यालाही आता कोर्टात आवाहन देण्यात आलं आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय आरक्षण, प्रभाग रचना आणि वाढीव सदस्य संख्या या मुद्य्यांमुळे निवडणूक सध्या होत नाहीत.
राज्यातील सत्ताधाऱ्यांना निकालाची भीती?
महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत आलं. त्यात आता अजित पवार देखील सामील आहेत. परंतु जनमानसात याचा वाईट परिणाम जाहला आहे. त्यामुळे जर निवडणूक झल्या तर या निवडणुकांमध्ये किती यश मिळेल आणि त्याचा लोकसभा निवडणुकीवर किती परिणाम होईल याचा अंदाज सत्ताधाऱ्यांना नाही आणि हेच कारण आहे की सरकार सध्या निवडणूक घेण्यास इच्छुक नाही, अशा प्रकारच्या चर्चा सध्या होत आहेत.
राजकीय गणिते हुकली
महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी जोरदार तयारी चालवली आहे.ही तयारी मागील तीन वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे हे इच्छुक उमेदवार सध्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी वारेमाप खर्च करत आहेत.
परंतु आता निवडणुकांचं होण्याची शाश्वती नसल्याने त्यांची राजकीय गणिते हुकली आहेत. तसेच कार्यकर्त्यांना कधी पर्यंत सांभाळावे, व किती पैसे खर्च करावेत याचे गणित सध्या त्यांना जुळवताना नाकीनऊ येत आहे अशी चर्चा आहे.