Ahilyanagar News : जेव्हा गोदावरी कालव्याचे काम पूर्ण होईल, तेव्हापासून पुढील २५ वर्षे आपल्या मुलाबाळांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही असा आम्ही शब्द नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने देतो असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
एकरुखे तालुका राहाता येथे नाशिक पाटबंधारे विभागाच्या गोदावरी कालवे तुलाकरण उपविभाग क्रमांक १, नाशिक अंतर्गत उजव्या तट कालव्यामधून एकरूखे गावासाठी नवीन अतिवाहक एस्केपच्या कामाचे भूमिपूजन युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी ते उपस्थित ग्रामस्थांशी बोलत होते.

जेव्हा गोदावरी कालव्याचे काम पूर्ण होईल, तेव्हा गणेश परिसरामध्ये पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही. तसेच उजव्या कालव्याच्या उपचाऱ्यांसाठी ३०२ कोटी रुपये खर्चास तांत्रिक मंजुरी मिळाली असून येणाऱ्या काही दिवसात ते देखील काम पूर्ण होईल.
चारी नंबर १ व चारी नंबर २० पर्यंतच्या उपचाऱ्यांचे काम देखील पुढील पाच वर्षांमध्ये पूर्ण होईल असा मी यावेळी शब्द देतो. तसेच उजव्या कालव्याचे आवर्तन संपूर्ण झाल्यानंतर कुणीही शेतकरी यापुढे पाण्यापासून वंचित राहणार नाही, हा शब्द मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने देतो.
या विधानसभेमध्ये आमच्या विरोधकांनी सर्व प्रयत्न केले. त्यामध्ये गणेशचे संचालक असतील, नेते असतील यांच्यासह आमचा पराभव करण्यासाठी देशातील नेते आले. तरी देखील आपण सत्तर हजार मताधिक्य घेऊन विजयी झालो. असे देखील डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले.
सर्वसामान्य गोरगरिब जनतेच्या विश्वासास आपण पात्र ठरू असेच काम आम्ही करत आहोत. महत्त्वाचं म्हणजे गोदावरी उजव्या कालव्याच्या ऑफिसला १० रुपये मंजूर होऊन पुढील सहा महिन्यात उद्घाटन होईल. तसेच राहाता नगरपंचायतीसाठी नळ पाणीपुरवठा योजनेसाठी लवकरच अंदाजे ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन ते देखील काम पूर्ण होईल.
जेणेकरून प्रत्येकाच्या घरात स्वच्छ पाणी गेले पाहिजे. तसेच वीरभद्र रंगनाथ बाजारतळाचे खोदकाम करून काँक्रीटीकरण करून लोकांना बाजारासाठी चांगली सुविधा उपलब्ध करण्याच्या कामाला देखील लवकरच सुरुवात होईल.
चार वर्ष अशी विकास कामं करायची की शेवटच्या एका वर्षांमध्ये लोकांनी म्हटलं पाहिजे की आपल्या गावामध्ये कशाशीच गरज नाही. ८० टक्के मतदान पडल्याशिवाय गावात घ्यायचे नाही ही भूमिका जनसामान्य माणसांनी मांडली पाहिजे, कारण की कामाच्या माध्यमातून मतांमध्ये रूपांतर होत असतं. असे देखील यावेळी सुजय विखेंनी स्पष्ट केले.
निळवंडेचे पाणी हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतं, हे आपण करून दाखवलं. कुणी स्वप्नात देखील विचार करू शकले नव्हते की हे पाणी आपल्याला मिळेल. परंतु, आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो आणि विखे पाटील परिवाराची ख्याती आहे.