Shirdi Politics : ज्यांनी साईबाबाला फसवले, जनतेला फसवले, सेनाप्रमुख उद्धव ठाकरेंना फसवले, काँग्रेसलाही फसवले, त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली, तर ते मतदारसंघाचे दुर्दैव ठरेल.
त्यांना जर उमेदवारी दिली, तर आपण त्यांचे विरोधात बंड करू असे म्हणत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड यांनी विरोध केला आहे.
शिवसेनेचे समन्वयक गायकवाड यांनी श्रीरामपुरात पत्रकार परिषद घेऊन विरोध केला. यावेळी अॅड. मिलिंद गायकवाड, राजेंद्र साठे, भीमजी साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना धडा शिकवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आपला त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. शिवाय ते शारीरिकदृष्ट्या तंदरुस्त नाहीत, त्यामुळे मतदारसंघाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत.
आपणही स्वतः उमेदवारीसाठी आग्रही असून त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले. खासदार लोखंडे यांच्यावरही त्यांनी टिका केली. विद्यमान खासदार कधीही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत.
त्यांना संसदेत मतदारसंघाचे प्रश्न व्यवस्थित मांडता येत नाहीत, असे म्हटले. तर केंद्रीय मंत्री आठवले यांना उमेदवारी मिळाल्यास स्वागतच आहे, असेही ते म्हणाले.
ज्यांना उमेदवारी करण्याची इच्छा आहे, त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले पाहिजे. युवा सेनेच्या मेळाव्याच्या नियोजनासाठी सर्व पदाधिकारी श्रीरामपुरात होते. आम्हाला कोणीही संपर्क केला नाही, असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख सचिन बडदे यांनी यासंदर्भात सांगितले.
पत्रकार परिषदेला एकाही पदाधिकाऱ्याची उपस्थिती नाही
गायकवाड यांनी श्रीरामपुरात पत्रकार परिषद घेतली. पण श्रीरामपुरातील शिवसेनेचे अशोक थोरे, सचिन बडदे, संजय छल्लारे आदींसह इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. शिवाय जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या उपस्थितीत श्रीरामपुरात युवा सेनेच्या मेळाव्याबाबत बैठक होती.
जिल्ह्यातील पदाधिकारी त्याला उपस्थित होते. मात्र, पत्रकार परिषदेला मात्र कोणीही उपस्थित नव्हते. यावर विचारले असता आपण सर्वांशी फोनवर बोललो असल्याचे त्यांनी सांगितले.