Ahmednagar Politics : लोकसभेच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेचच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे सध्या राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे.
अशातच आता अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. ती म्हणजे उबाठा शिवसेना अर्थातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील एक बडा नेता पक्षाला राम-राम ठोकणार असे वृत्त समोर आले आहे. खरेतर सध्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अहमदनगर दौऱ्यावर आहेत.

ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसंवाद दौरा आयोजित केला आहे. उद्धव ठाकरे यांनी नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहेत.
अशातच मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे उबाठा शिवसेना गटाचे संपर्क नेते बबनराव घोलप यांनी पक्षप्रमुखांच्या दौऱ्यालाच दांडी मारली असल्याचे पाहायला मिळाले आहे.
विशेष म्हणजे बबनराव घोलप यांच्या कार्यक्रमाला डावलून मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला मुंबईत स्पॉट केले गेले आहेत. यामुळे शिंदे यांच्या गटात बबनराव घोलप यांची इंट्री होणार अशा चर्चा पाहायला मिळत आहेत. दरम्यान घोलप यांना याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता घोलप यांनी उबाठा शिवसेना गटाचा राजीनामा देणार असे स्पष्ट केले असून अजून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार की नाही याबाबत काहीच ठरलेले नसल्याचे सांगितले आहे.
घोलप यांनी येत्या एक ते दोन दिवसात राजीनामा देणार असे सांगितले आहे. खरेतर जोपर्यंत माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी उबाठा शिवसेना गटात प्रवेश केला नव्हता तोवर बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत होते.
घोलप यांना उबाठा शिवसेना गटाकडून उमेदवारी मिळणार अशी आशा होती. पण, माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून बबनराव घोलप यांची नाराजी उघडपणे पाहायला मिळतं होती. याबाबतची नाराजी त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडेही देखील बोलून दाखविली होती.
विशेष बाब अशी की, वरिष्ठ नेत्यांनी याबाबत लवकरच चर्चेतून तोडगा काढू असे संकेतही दिले होते. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नगर दौरा आयोजित केला असल्याचे बोलले जात होते. पण ठाकरे नगर येथे पोहोचताच बबनराव घोलप यांनी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली आहे. शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या समवेत त्यांनी 12 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत चर्मकार महामंडळ व चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांबाबत चर्चा झाली आहे.
वीस सदस्यांच्या या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेत विविध मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहे. तसेच मुंबईत गोवंडी येथे संत रोहिदास चर्मकार प्रशिक्षण व लघुउद्योग केंद्राची निर्मिती करण्याचे ठरले असल्याची माहिती समोर आली आहे.
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातील रिक्त पदे भरून महामंडळाला पुरेसा निधी उपलब्ध करण्याबाबतही मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. दरम्यान, या महामंडळाचे अध्यक्षपद घोलप अथवा त्यांचे चिरंजीव यांना दिले जाईल अशी शक्यता सध्या मीडिया रिपोर्टमध्ये वर्तवली जात आहे.
या सर्व घडामोडींवरून बबनराव घोलप यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधीच घोलप यांनी उबाठा शिवसेनेची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असल्याने याचा मोठा फटका पक्षाला सहन करावा लागू शकतो अशा चर्चा सध्या पाहायला मिळत आहेत.













