Ahmednagar News : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे काल अहमदनगर जिल्ह्यात होते. सोनई या ठिकाणी त्यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
यावेळी सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेत घणाघात केला. त्यांनी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांचाही चांगलाच समाचार घेतला.
ते म्हणाले, आमचे एक खासदार पाणी भरायला तिकडे गेले, त्यांना म्हणा, तुम्ही फक्त उभं राहूनच दाखवा, निष्ठावंत तुम्हाला पाणी पाजतील.
त्यांना निळवंडेचे नाही तर पराभवाचे पाणी पाजा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी खा. सदाशिव लोखंडे यांच्यावर त्यांचा नामोल्लेख टाळत घणाघात केला.
यावेळी खा. संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मिलींद नार्वेकर, माजीमंत्री शंकरराव गडाख, शिवसेनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप म्हणेल तेच हिंदुत्व आणि भाजप म्हणेल तेच देशप्रेम, हे साफ खोटे आहे. खरे हिंदुत्व काय आहे, हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेले आहे.
शिवसेना-भाजप युतीची २०- २५ वर्षे गेली त्यात शिवसेनेची मौल्यवान वर्षे भाजपबरोबर जाऊन सडली. आम्ही हिदुत्वाची पालखी वाहू मात्र कुठल्याही परिस्थितीत आता भाजपची पालखी वाहणार नाही.
शेतक-यांनी भाजपला दिल्लीपर्यंत पाठवले त्यांना हे सरकार दिल्लीत अडवते आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्याने त्यांच्या डोळयात आधीच अश्रू आहेत, तुम्ही आणखी अश्रुधूर का सोडता ? भाजपाने लोकांमध्ये हिंदुत्वावरून शिवसेनेबद्दल मोठा गैरसमज करून दिला होता.
परंतु, आता लोकांना खरे हिंदुत्व कोणाचे आहे, हे समजले आहे. शिवसेनेचे हिंदुत्व हे चूल पेटवणारे हिंदुत्व आहे तर भाजपाचे हिंदूत्व हे घर पेटवणारे हिंदुत्व आहे.
भ्रष्टाचार करा आणि भाजपात या, काही होणार नाही, हीच ती मोदींची गॅरंटी असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली व म्हणाले,
फडणवीस म्हणतात, आमच्याकडे फिल्टर आहे. परंतु, जो जादा भ्रष्टाचार करील त्याला तेवढे मोठ पद, हेच का ते फिल्टर? असा सवाल करत त्यांनी फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.