एका बाजूला देश झपाट्याने आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे, तर दुसरीकडे डोंगररांगा, बर्फाळ खिंडी आणि दुर्गम रस्ते हे आजही आपल्या सीमावर्ती भागांतील दैनंदिन जीवनात अडथळा ठरतात. मात्र, आता याच बदलासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जात आहे. जम्मू-काश्मीरमधील झोजिला खिंडीत आशियातील सर्वात लांब बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच हा बोगदा लडाखला देशाच्या मुख्य प्रवाहाशी अखंड जोडेल.
झोजिला बोगदा
या बोगद्याचे महत्त्व फक्त त्याच्या लांबीपुरते मर्यादित नाही, तर तो एका अशा भागात बांधला जात आहे जिथे वर्षातील सहा महिने बर्फाने सारे आवरलेले असते. हिवाळ्यात झोजिला खिंड बंद झाली की, लडाखमधील नागरिक आणि लष्कराचा संपर्क देशाच्या उर्वरित भागाशी तुटतो. या पार्श्वभूमीवर हा 13 किलोमीटर लांबीचा बोगदा म्हणजे केवळ एक बांधकाम प्रकल्प नसून, त्या भागातील जीवनमान सुधारणार आहे.

हा बोगदा बांधण्याची कल्पना अनेक वर्षांपासून चर्चेत होती, मात्र प्रत्यक्षात 2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची पायाभरणी केली आणि त्यानंतर कामाला गती मिळाली. झोजिला खिंडीतून जाणारा हा बोगदा उंच पर्वतरांगेखाली जाईल. 7.57 मीटर उंच असलेला आणि घोड्याच्या नाळाच्या आकारात बांधण्यात येणारा हा बोगदा दोन लेनचा असून, त्याचे बांधकाम अत्यंत कठीण हवामानात सुरू आहे. विशेष म्हणजे हा बोगदा बांधताना ज्या आधुनिक पद्धतींचा वापर केला जात आहे, त्यातून भारताची अभियांत्रिकी प्रगती देखील ठळकपणे दिसून येते.
2026 पर्यंत बोगदा खुला होणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच माहिती दिली की, बोगद्याचे काम सध्या 70 टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे आणि 2026 पर्यंत तो वाहतुकीसाठी खुला होईल. विशेष म्हणजे, सुरुवातीला या प्रकल्पासाठी अंदाजे 12,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता, पण गडकरी यांच्या म्हणण्यानुसार, तो फक्त 5,500 कोटी रुपयांत पूर्ण केला जाईल. म्हणजेच, तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यामुळे जवळपास निम्म्या खर्चात देशाला हा ऐतिहासिक बोगदा मिळणार आहे.
झोजिला बोगदा पूर्ण झाला की, सध्या तीन तास लागणारा खिंड पार करण्याचा वेळ केवळ वीस मिनिटांवर येईल. ही वेळेतील बचत केवळ प्रवाशांसाठी नाही, तर विशेषतः लष्कराच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाची आहे. लडाखमधील सीमारेषेवर तैनात जवानांसाठी रस्ते सतत खुले राहणं ही एक सामरिक गरज आहे आणि या बोगद्यामुळे ती पूर्ण होणार आहे.
बोगद्यातील सुविधा
या प्रकल्पामध्ये केवळ रस्ता नाही, तर सुरक्षा आणि सुविधा यांचाही विचार केला गेला आहे. बोगद्यात अत्याधुनिक SCADA प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे, रेडिओ कंट्रोल, वायुवीजन आणि वीज पुरवठ्याचीही योग्य सोय करण्यात येणार आहे.