8 Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बहुप्रतिक्षित आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. सरकारने अधिकृतपणे आठव्या वेतन आयोगाची घोषणा केल्यानंतर त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीच्या शिफारसींनंतरच कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होणार, यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र, त्याआधीच महागाई भत्त्याच्या (DA) आकड्यांमुळे फिटमेंट फॅक्टरबाबत मोठे संकेत मिळत आहेत.

आठव्या वेतन आयोगातील पगारवाढ ही मुख्यत्वे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. सध्या उपलब्ध माहितीनुसार, हा फिटमेंट फॅक्टर किमान 1.60 पेक्षा कमी असण्याची शक्यता फारच कमी आहे. उलट, तो यापेक्षा अधिक वाढू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
महागाई भत्ता हा CPI-IW (Consumer Price Index for Industrial Workers) वर आधारित असतो. डिसेंबर 2025 अखेरीस CPI-IW निर्देशांक 148.2 पॉइंट्सवर पोहोचल्याची माहिती आहे.
या आधारावर जानेवारी 2026 मध्ये महागाई भत्त्यात सुमारे 2 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सध्याचा महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून थेट 60.34 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. प्रत्यक्षात हा भत्ता 60 टक्क्यांपर्यंत गोल केला जाऊ शकतो.
सध्या सातव्या वेतन आयोगानुसार बेसिक सॅलरीवर महागाई भत्ता लागू केला जातो. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 100 रुपये असेल, तर 60 टक्के महागाई भत्त्यानंतर त्याला एकूण 160 रुपये मिळतात. याच गणितामुळे आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किमान 1.60 असावा, असा तर्क लावला जात आहे.
महागाई भत्ता वाढलेला असला तरी अद्याप त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. केंद्र सरकार लवकरच याबाबत निर्णय जाहीर करेल, अशी शक्यता आहे.
एकूणच महागाई भत्त्याची वाढ आणि वाढती महागाई लक्षात घेता, आठव्या वेतन आयोगात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ मिळण्याची अपेक्षा बळावली आहे. मात्र, फिटमेंट फॅक्टर आणि पगारवाढीबाबतची अंतिम चित्र समितीच्या शिफारसीनंतरच स्पष्ट होणार आहे.













