Nagar Railway News : अहिल्यानगर, पुणे आणि नागपूर मधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या रेल्वे गाडीची घोषणा करण्यात आली आहे. ही रेल्वे गाडी आपल्या नगर मधून धावणार असल्याने याचा जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना देखील मोठा फायदा होणार आहे.
विकेंडच्या काळात पुणे ते विदर्भ आणि मराठवाड्याकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. पुणे ते नागपूरदरम्यान विशेष शुल्कासह सुपरफास्ट विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे विकेंडमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 01467 / 01468 पुणे–नागपूर–पुणे सुपरफास्ट विशेष या गाड्या आठवड्याला प्रत्येकी एक फेरी करणार आहेत. या विशेष सेवेचा लाभ मोठ्या संख्येने प्रवाशांना होणार असून, विशेषतः नोकरी, शिक्षण आणि कौटुंबिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे.
दरम्यान आता आपण या विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तसेच ही गाडी कोणकोणत्या स्टेशनवर थांबा घेणार याची पण माहिती आज आपण येथे पाहणार आहोत.
विशेष गाडीचे वेळापत्रक कसे राहणार?
ट्रेन क्रमांक 01467 पुणे–नागपूर विशेष शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी पुणे स्टेशनवरून दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी नागपूर येथे पोहोचणार आहे.
त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक 01468 नागपूर–पुणे विशेष शनिवार, दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी नागपूर येथून सकाळी 8 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी पुणे येथे दाखल होईल.
कोणकोणत्या स्टेशनवर थांबणार ?
या विशेष सुपरफास्ट गाडीला प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील प्रवाशांनाही या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.
20 डब्यांच्या गाडीमुळे पुणे – नागपूर प्रवास करणाऱ्यांना दिलासा
या गाडीमध्ये एकूण 20 डबे असणार आहेत. यामध्ये 2 वातानुकूलित 2-टायर, 4 वातानुकूलित 3-टायर, 8 स्लीपर क्लास, 4 सामान्य द्वितीय श्रेणी, 1 जनरेटर व्हॅन आणि 1 गार्ड ब्रेक व्हॅन यांचा समावेश आहे. विविध प्रवासी वर्गांचा विचार करून ही डब्यांची रचना करण्यात आली आहे.
दरम्यान, या विशेष रेल्वे सेवेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ही सेवा प्रवाशांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.













