उच्च शिक्षण घेणे आणि शिक्षण घेऊन शिक्षणाशी संबंधित असलेल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पॅकेजची नोकरी मिळवून त्यातच संपूर्ण आयुष्यभर समाधानी राहणे हा तरुणाईचा ट्रेंड आपल्याला दिसून येतो. परंतु हा जो काही ट्रेंड आहे तो आता बदलताना आपल्याला दिसून येत आहे.असे अनेक तरुण-तरुणींचे उदाहरण आपल्याला घेता येतील की त्यांनी उच्च शिक्षण तर घेतले.
परंतु नोकरीच्या मागे न लागता एखाद्या व्यवसायामध्ये पडून त्या व्यवसायात त्यांनी यश संपादन केले.उच्च शिक्षण घेऊन लाखो रुपयांची पगाराची नोकरी मिळवण्याची संधी सोडून व्यवसायात पडणे हे तसे पाहायला गेले तर जोखमीचे काम आहे.
परंतु या सगळ्या प्रकारची जोखीम पत्करून बऱ्याच तरुण-तरुणींनी व्यवसायात पदार्पण करून व्यवसाय यशस्वी केले आहेत. अगदी याच पद्धतीने आपल्याला राजस्थान राज्यातील भीलवाडा पासून काही अंतरावर असलेल्या हमीरगडची पूर्वा जिंदल या उच्चशिक्षित तरुणीचे उदाहरण घेता येईल.
पूर्वा जिंदाल ही उच्चशिक्षित तरुणी असून तिने एमबीए पूर्ण केलेले आहे. परंतु नोकरी न करता ही तरुणी सेंद्रिय पद्धतीने भाज्या आणि फळांचे उत्पादन घेऊन लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून शेतीमध्ये यशस्वी ठरली आहे. विशेष म्हणजे तिने या सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला व फळे पिकवण्याचा प्रयोग राजस्थानच्या माळरानावर यशस्वी केला आहे.
पूर्वा जिंदाल सेंद्रिय शेतीतून मिळवते लाखोत उत्पन्न
राजस्थानच्या भलवाड्यापासून जवळ असलेल्या हमीरगडची राहणारी पूर्वा जींदाल ही उच्चशिक्षित असून एमबीए पूर्ण केलेले आहे. परंतु त्यानंतर नोकरीच्या मागे न लागता या तरुणीने सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला व याविषयीची माहिती युट्युब आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळवत तिने त्यावर संशोधन करत सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली.
विशेष म्हणजे तिचा हा सेंद्रिय शेतीचा प्रयोग तिने राजस्थानच्या माळरानावर यशस्वी केला आहे. सध्या संपूर्ण जगात सेंद्रिय शेतीची मागणी चांगली असून सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला आणि फळांना मागणी चांगली असल्याने दर देखील चांगला मिळतो.
या सगळ्या कारणामुळे कोरोना महामारीनंतर पूर्वा यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. पूर्वा जिंदालने दहा एकर जमिनीचा दर्जा सुधारला व त्यामध्ये भाज्यांची लागवड करायला सुरुवात केली. या दहा एकर क्षेत्राचे तिने तीन भागात विभाजन केले व योग्य पद्धतीने सगळ्या प्रकारचे सेंद्रिय शेतीचे नियोजन केले आहे.
सेंद्रिय निविष्ठा वापरण्यावर देते भर
पूर्वा जिंदाल ही तिच्या सेंद्रिय शेतीतून पिकवणाऱ्या भाजीपाला व फळ पिकांचे सगळ्या प्रकारचे नियोजन करताना रासायनिक खते किंवा रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या अजिबात करत नाही.
शेणखतासारखा सेंद्रिय खताचा वापर संपूर्ण भाजीपाला व फळ पिकांना केला जातो. त्यामुळे त्यांनी पिकवलेल्या सेंद्रिय भाजीपाला व फळांना राजस्थानमध्ये स्थानिक पातळीवर खूप मोठी मागणी आहे.
विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवण्यासोबतच गिर जातीच्या देशी गाईंचे संगोपन करत त्यांनी दूध व्यवसायामध्ये देखील पदार्पण केले आहे. पूर्वा जिंदाल या गिर गाईंच्या दुधापासून तूप तयार करतात व त्याची विक्री करून त्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.
आज सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाला व फळांच्या उत्पादनातून पूर्वा जिंदाल वर्षाला 25 लाख रुपयांची कमाई करत असून एखाद्या इंजिनियर वर्षाला जितकी कमाई करणार नाही त्यापेक्षा जास्तीची कमाई या सेंद्रिय शेतीतून पूर्वा जिंदाल करत आहे.