Agriculture News : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते ही देखील अशीच एक कल्याणकारी योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी पानंदरस्ते तयार करून दिले जातात. खरं पाहता शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी चांगले शेतरस्ते असणे आवश्यक असते. मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले रस्ते नसतात.
परिणामी शेतमाल वाहतूक करणे, मजुरांना शेतात घेऊन जाणे, बी बियाणं शेतात नेणे, एवढेच नाही तर मशागतीसाठी ट्रॅक्टर किंवा इतर वाहन नेतांना अडचणी निर्माण होत्यात. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले पानंद रस्ते उपलब्ध व्हावेत या अनुषंगाने ही योजना सुरू झाली आहे. दरम्यान, आता सोलापूर जिल्ह्यासाठी या योजनेसंदर्भात एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे.
या योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाणंद रस्ते तयार करण्यासाठी एकूण 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता दक्षिण सोलापूर तालुक्यात 80 किलोमीटरचे पाणंद रस्ते तयार होणार आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे, या योजनेच्या माध्यमातून शेतीशिवार गावांना जोडले जाणार आहे. तालुक्यासाठी वीस कोटी रुपये उपलब्ध झाले असल्याने तालुक्यातील संपूर्ण 29 गावांमध्ये या योजनेच्या माध्यमातून पाणंद रस्ते विकसित केले जाणार आहेत.
एका किलोमीटरसाठी 25 लाख रुपये याप्रमाणे या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध झाला असून आता या 29 गावांमध्ये 80 किलोमीटरचे शेतीरस्ते तयार होणार आहेत. आता या योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून दक्षिण सोलापूर तालुक्यातील संपूर्ण गावात किमान दोन किलोमीटर आणि जास्तीत जास्त सहा किलोमीटर पर्यंतचे पानंद रस्ते तयार केले जाणार आहेत. याशिवाय आमदार देशमुख यांनी संबंधितांना पाणंद रस्ते संदर्भात शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या किंवा त्रुटी असतील त्या लवकरात लवकर दूर करण्याचे सूचना दिल्या आहेत.
सोबतच शेतकऱ्यांना देखील मोजणीची मागणी करणे, कोर्टात जाणे यासारख्या गोष्टी टाळण्याच आवाहन त्यांनी यावेळी केल आहे. आमदार देशमुख यांच्या मते शेतकऱ्यांनी असं केल्यास काम होण्यास विलंब होतो तसेच पुढील काम मंजूर होण्यास देखील यामुळे अडचणी निर्माण होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा गोष्टी टाळाव्यात आणि सहकार्य करावे असे देखील यावेळी आमदार महोदय यांनी नमूद केले. निश्चितच दक्षिण सोलापूर तालुक्यातील 29 गावांमधील शेतकऱ्यांसाठी यामुळे दिलासा मिळणार आहे.