Agriculture News : येत्या दीड महिन्यात महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी आवश्यक पूर्वतयारी देखील सुरू केली आहे.
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही खरीप हंगामासाठी जमिनीच्या पूर्व मशागतीची तयारी सुरू केली असून आता येत्या काही दिवसात शेतकरी बांधव बियाणे तसेच खतांचा देखील आवश्यक साठा करून ठेवतील.

मात्र अनेकदा बियाणे तसेच खतांसाठी शेतकऱ्यांना अधिकची मेहनत घ्यावी लागते. त्यांना वेळेवर खते तसेच बियाणे उपलब्ध होत नाहीत. म्हणजेच बियाणे व खतांची काळाबाजारी नेहमीच पाहायला मिळाली आहे.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे व खते कमी पडणार नाहीत.
तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार कृषि निविष्ठा देण्यात यावी. बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक अथवा लिंकिंगचे प्रकार होणार नाहीत अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या आहेत.
शिवाय ज्या तालुक्यात जादा दराने बियाणे, खत विक्री अथवा शेतकऱ्यांच्या फसवणुकीसह लिंकिंगचे प्रकार घडतील, त्या तालुका कृषी अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील यावेळी पाटील यांनी दिला आहे.
हे पण वाचा :- गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! ‘हा’ 5 रुपयाचा स्टॉक पोहचला 590 रुपयावर, 78 हजाराचे बनलेत 1 कोटी; पहा डिटेल्स
निश्चितच यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे आणि खते उपलब्ध होतील आणि त्यांना खरीप हंगामात खतांसाठी तसेच बियाण्यांसाठी पायपीट करावी लागणार नाही असा आशावाद व्यक्त होत आहे. खरीप हंगाम पुर्व नियोजन व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नुकतीच पार पडली आहे.
ही बैठक महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून या बैठकीत मंत्री महोदय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हा इशारा दिला आहे. यामुळे या हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खत आणि बियाणे उपलब्ध होतात का हे विशेष पाहण्यासारख राहणार आहे.













