Agriculture Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच पशुपालकांसाठी कायमच वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण अशा योजना अमलात आणल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान देण्याचे प्रावधान असते. अशाच एका योजनेच्या माध्यमातून राज्यातील पशुसंवर्धन विभागाकडून दुधाळ जनावरे वाटप केली जात आहेत.
मात्र आतापर्यंत या दुधाळ जनावर वाटप योजनेअंतर्गत जी काही खरेदी किंमत ठरवण्यात आली होती दुधाळ जनावर खरेदी करण्यासाठी तोकडी ठरत होती. पशुखाद्याचे दर वाढले असल्याने तसेच इंधन दरवाढ झाली असल्याने अलीकडील काही काळात दुधाळ जनावरांच्या किमती देखील मोठ्या वाढल्या आहेत.
त्यामुळे या योजनेअंतर्गत दुधाळ जनावर खरेदीसाठी जी खरेदी किंमत ठरवण्यात आली होती ती खूपच कमी होती. अशा परिस्थितीत या खरेदी किंमतीत वाढ करण्याची मागणी केली जात होती. शासनाने देखील या मागणीवर सकारात्मक असा निर्णय घेत दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत वाढ केली आहे. आता या योजनेअंतर्गत गाईच्या खरेदीसाठी 70 हजार तर म्हशीच्या खरेदीसाठी 80 हजार रुपयांचे प्रावधान राहणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पूर्वी गाई म्हशींच्या खरेदीसाठी मात्र 40 हजार रुपये दिले जात होते. परंतु यामध्ये आता तीस ते चाळीस हजार रुपयांची वाढ करण्यात आली असल्याने पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सन 2023 24 पासून राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली ही वाढ लागू राहणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकऱ्यांना दुधाळ गाई म्हशींचे वाटप हे केले जात असते. अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदान मिळते. तसेच नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान या अंतर्गत देण्यात येते.
योजनेसाठी अर्ज कोठे आणि कसा करायचा बरं?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना http://ah.mahabms.com/ या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाईटवर इच्छुक शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सध्या 2022-23 या वर्षातील योजनेचे अर्ज प्रक्रियेत आहेत, मात्र या 2022-23 या वर्षासाठी अर्ज केलेल्या आणि पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना खरेदी दरात जी काही वाढ झाली आहे ती लागू राहणार नाही. तर जनावरांचे सुधारित दराबाबतची योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून समोर आली आहे.