Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अगदीच महत्त्वाची अन आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आगामी काळात जिल्ह्यात दोन नवे रस्ते तयार केले जाणार आहेत. जिल्ह्यातील या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांच्या संदर्भात नुकतेच एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
शेवगाव बाह्यवळण रस्ता तसेच सावळीविहीर ते अहील्यानगर रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विधान भवनात ही बैठक झाली होती. या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आमदार तथा जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा उपस्थित होते.

विखे पाटील यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आढावा बैठकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेसह सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक अधिकारी सुद्धा हजर होते. दरम्यान आता आपण या बैठकीत नेमका काय निर्णय घेण्यात आला? याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
बैठकीत काय ठरले?
नुकत्याच संपन्न झालेल्या या आढावा बैठकीत शेवगाव रिंग रोड म्हणजेच बाह्यवळण रस्त्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच श्रीक्षेत्र नाशिक येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वी जिल्ह्यातील अहिल्यानगर ते सावळी विहीर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
शेवगाव बाह्यवळण रस्त्याबाबत काय चर्चा झाली
या बैठकीत उपस्थित असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी शेवगाव बाह्यवळण रस्त्याच्या आराखड्याची माहिती दिली तसेच याच्या भूसंपादनाबाबत आणि निधीच्या उपलब्धतेबाबत सुद्धा या बैठकीत आढावा घेण्यात आला.
खरंतर शेवगाव बाह्यवळण रस्त्याच्या संदर्भात माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि शेवगावचे आमदार मोनिका राजळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्यातून या रस्त्याच्या कामाचा आराखडा तयार झालेला आहे.
दरम्यान या 22.602 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 56.191 हेक्टर जमीन संपादीत करावी लागणार आहे. तसेच, यासाठी 80 कोटी रूपयांच्या निधीचा प्रस्ताव सुद्धा अर्थसंकल्पातील तरतूदीसाठी सादर करण्यात आला असल्याची माहिती या बैठकीतून समोर आली आहे.
दरम्यान या बैठकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा रस्ता चारपदरी करावा अशी सूचना दिली आहे. या रस्त्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
अहिल्यानगर – सावळी विहीर रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार
येत्या काही महिन्यांनी श्रीक्षेत्र नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होणार आहे. दरम्यान या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे येणारे भाविक शिर्डी आणि शनिशिंगणापूर सारख्या नगर जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना सुद्धा भेट द्यायला येणार आहेत.
यामुळे श्रीक्षेत्र नाशिक येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी अहिल्यानगर ते सावळीविहीर या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यासाठी 515 कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे आणि कामाच्या सूचना देखील निर्गमित करण्यात आल्या आहेत.
यामुळे या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही तडजोड न करता या रस्त्याचे काम सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीतून संबंधित अधिकाऱ्यांना मिळालेल्या आहेत.