Ahilyanagar Picnic Spot : महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर. या जिल्ह्याला सहकाराची पंढरी म्हणूनही ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार, सहकारी साखर कारखान्याचे आगार असणाऱ्या या जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलाय.
या जिल्ह्याला आधी अहमदनगर या नावाने ओळखले जात असे मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या समानार्थ नगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर असे करण्यात आले आहे. खरे तर, अहिल्यानगर जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या एक संपन्न जिल्हा आहे.

अहिल्यानगर मध्ये फिरण्यासारखी अनेक ठिकाणे तुम्हाला पाहायला मिळतील. हिरवेगार डोंगर, शांत वातावरण, पांढरे शुभ्र फेसाळणारे धबधबे अशी निसर्गाची विहंगम दृश्य तुम्हाला जिल्ह्यात ठीकठिकाणी पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील एका अशा थंड हवेच्या ठिकाणाची म्हणजेच हिल स्टेशनची माहिती पाहणार आहोत जिथे दरवर्षी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.
हे आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील फेमस हिल स्टेशनं
तुम्ही शिमला कुल्लू मनाली महाबळेश्वर भीमाशंकर अशा अनेक हिल स्टेशनला भेट दिलेली असेल. पण जर तुम्हाला नगर जिल्ह्यातील थंड हवेच्या ठिकाणी भेट द्यायची असेल तर भंडारदरा या हिल स्टेशनला तुम्ही आवर्जून भेट द्यायला हवी.
जर तुम्ही पावसाळ्यात पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर नगर जिल्ह्यातील हे हिल स्टेशन तुमच्यासाठी परफेक्ट राहणार आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणात पिकनिकचा आनंद लुटायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या परिवारासमवेत तसेच तुमच्या मित्रांसमवेत एकदा आवर्जून जा.
पांढऱ्या शुभ्र धुक्यांनी झाकले गेलेले हिरवेगार डोंगर, हिरव्या शालूने नटलेला निसर्ग, पांढरा शुभ्र फेसाळणारा धबधबा आणि चहू बाजूला दिसणारी हिरवळ हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य. महत्त्वाचे म्हणजे भंडारदराला जाताना तुम्हाला वळणावळणाचा घाट सुद्धा लागणार आहे आणि या घाटातून प्रवास करणे खरंच रोमहर्षक आहे.
इथे गेल्यानंतर तुम्ही भंडारदरा डॅमला सुद्धा व्हिजिट करायला हवी. हे धरण 1910 मध्ये बांधण्यात आले होते आणि याला विल्सन डॅम असे म्हणतात. ऑर्थर लेक हे देखील येथील एक प्रमुख आकर्षण आहे.
या लेकच्या आजूबाजूला असणारे घनदाट जंगल आणि उंच टेकड्या या जागेचे सौंदर्य फारच वाढवतात. हा तलाव बोटिंग साठी आणि कॅम्पिंग साठी विशेष प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला धबधब्यांचे विहंगम दृश्य आपल्या नजरेत कैद करायचे असेल तर तुम्ही अम्ब्रेला फॉल्सला सुद्धा भेट द्यायला हवी.
ओसंडून वाहणारा हा धबधबा पर्यटकांना भुरळ घालणारा आहे. त्यामुळे भंडारदराला गेलात तर या धबधब्याचे दृश्य पाहायला विसरू नका. भंडारदरापासून अवघ्या काही अंतरावर अमृतेश्वर हे एक महादेवाचे प्रसिद्ध मंदिर सुद्धा आहे.
या मंदिरात जाऊन तुम्ही महादेवाचे दर्शन सुद्धा नक्कीच घ्यायला हवे. याशिवाय तुम्ही रंधा धबधब्याला देखील भेट देऊ शकता हे देखील भंडारदर्याजवळील एक प्रमुख आकर्षण आहे.