संगमनेरमध्ये सुरू झाली मोठी लढाई ! थोरात-खताळ लढाईचा नवा अध्याय

खरं बाहेर येतंय? की कठपुतलीसारखं काम चाललंय? थोरात-खताळ युद्ध रंगात येणार

Published on -

Ahilyanagar Report : गेल्या ४०-४५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत संगमनेरमध्ये सत्ताबदल झाला. हा धक्का केवळ संगमनेर, अहिल्यानगर किंवा महाराष्ट्रालाच बसला नाही, तर थेट देशात या लढाईची चर्चा झाली. अमोल खताळ कोण? या एका ‘पीन पाँईंट’वर शेकडो व्हिडीओ आणि हजारो न्यूज तयार झाल्या. राज ठाकरेंपासून ते थेट राहुल गांधींपर्यंतच्या नेत्यांनी संगमनेरच्या लढतीवर भाष्य केले. ईव्हीएम मॅनेज केल्याशिवाय थोरात पराभूतच होऊ शकत नाही, असा दावा विरोधक अजूनही करताहेत. मात्र आता या निकालाला १०० दिवस उलटल्यानंतर थोरात- खताळ यांच्यातील खरं संघर्ष समोर येऊ लागला आहे.विद्यमान आमदार हे पूर्वेकडील नेत्याच्या कठपुतलीसारखे काम करताहेत, असा आरोप थोरातांच्या कार्यकर्त्यांनी केलाय. तर, तालुक्यातील वीज, पाणी प्रश्नावर थोरात बोलताहेत, म्हणजे ४० वर्षे ते निष्क्रिय राहीलेत असा आरोप खताळांनी केलाय. संगमनेर तालुक्यात नेमकं काय चाललंय? याच प्रश्नाचा हा स्पेशल रिपोर्ट…

संगमनेर कारखान्याच्या विश्रामगृहावर दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांची बैठक झाली. त्यात तालुक्यातील शेतकऱ्यांनी थोरातांसमोर विविध समस्या मांडल्या. मागील तीन महिन्यांपासून प्रवरा नदीकाठी तसेच पठार भागामध्ये पूर्ण दाबाने वीज मिळत नसून, विजेचा खेळखंडोबा झाल्याचा सूर नागरिकांनी काढला. पूर्ण दाबाने वीज मिळत नसल्याने नदीला पाणी असूनही पाणी उचलता येत नाही. त्यामुळे पिकांची राखरांगोळी झालीय, असं नागरिकांचं म्हणणं होतं. गावातलं पाणी पूर्वेला चाललंय, मात्र तालुका तहानलेलाच राहिलाय, अशी नाराजी संगमनेरकरांनी थोरातांसमोर मांडली.

संगमनेरकरांच्या या प्रश्नावर मात्र थोरात आक्रमक झाले. मागील ४० वर्षे जनतेला वीज, पाणीप्रश्नाच्या गोष्टी कळाल्या नाहीत. आता संघर्ष करावा लागतोय. त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन दबाव ठेवला पाहिजे, असे आवाहन थोरातांनी केले. आज सोमवारी सर्व शेतकऱ्यांसमवेत वीज अधिकाऱ्यांकडे जात थोरातांनी याबाबत निवेदनही दिले. आठ दिवसांत तालुक्यातील विजेची स्थिती सुधारली नाही तर, मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा थोरातांनी दिला.

आता संगमनेर कारखान्यावरील बैठकीनंतर, नूतन आ. अमोल खताळ यांनीही या सगळ्या प्रकारावर भाष्य केले. थोरातांना जोरदार चिमटा काढला. “स्वतःला जलनायक म्हणवता, मग तालुका तहानलेला का?” असा थेट सवाल त्यांनी थोरातांना केला. आमदार अमोल खताळ म्हणाले की, “पराभवानंतर का होईना, आता तरी कार्यकर्त्यांपुढे खरे बोलण्याची वेळ आली आहे. महायुती सरकार आल्यावर १०० दिवसांतच थोरातांना तालुक्यात पाणीटंचाई आहे, याची जाणीव झाली का? असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी विचारला. “तुम्ही तब्बल 45 वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले. राज्यातील अनेक सत्तास्थाने तुमच्या ताब्यात होती. तरीही तुम्ही तालुक्यातील भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरवू शकला नाहीत. तुम्ही तालुका जाणूनबुजून तहानलेला ठेवला, असा गंभीर आरोप खताळ यांनी थोरातांवर केला.

निकालानंतर १०० दिवसांत आपण तालुक्यासाठी काय केले, हेही खताळांनी सांगितले. ते म्हणाले की, “महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणार आहोत. त्यातून पठार भागातील पाणीप्रश्न सोडवला जाईल. शेतकऱ्यांची होणारी अडवणूक आणि लूट पूर्णपणे थांबवण्यात आम्हाला शंभर दिवसांत यश आले आहे. मागील महिन्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नादुरुस्त रोहित्र दोन दिवसांत बसवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तसेच, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत संगमनेर तालुक्यातील विजेच्या समस्यांवर सखोल चर्चाही झाली. महायुती सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माजी आमदारांकडे आता कोणतेही मुद्दे नसल्याने स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांनी मुद्दाम पाणी आणि वीजेच्या प्रश्नांवर टीका सुरू केली आहे, असा आरोपही आमदार खताळ यांनी केला. “तालुक्यातील जनता एवढी दूधखुळी नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. जनतेच्या पाठिंब्याने निवडून आलेल्या आमदारावर बोट दाखवण्यापूर्वी स्वतःच्या अपयशाकडे पाहण्याची गरज आहे,” असा उपरोधिक टोला त्यांनी थोरात यांना लगावला.

दुसरीकडे, थोरातांचे कार्यकर्ते व कृती समितीचे उपाध्यक्ष अरुण गुंजाळ यांनीही प्रसिद्धी पत्रक काढत नूतन आ. खताळ यांच्यावर जोरदार टिका केली. सध्याचे लोकप्रतिनिधी यांनी कायम पूर्वेकडील नेत्यांची हत्यार म्हणून काम केले आहे. तालुक्याची घडी मोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना येथील जनतेचे कोणतेही घेणे देणे नाही. त्यांना तालुक्याचा विकास माहिती नाही किंवा आत्तापर्यंत त्यांनी एक सुद्धा सामाजिक काम केले नाही, असा आरोप गुंजाळ यांनी केला. नदीला पाणी सुरू असताना तालुक्यातील विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहे. पिण्याच्या पाण्याचे सर्वत्र हाल सुरू आहेत. संगमनेर शहरामध्ये लाईटचा लपंडाव सुरू आहे. बाजारपेठ मंदावली आहे. अस्थिरता वाढीस लागली आहे. हे सर्व सुरू असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधी मात्र फक्त पत्रकबाजी करत आहेत, असा मुद्दा गुंजाळ यांनी मांडला.

आता खरा प्रश्न राहतो, तो संगमनेर तालुक्यात नेमके काय चाललंय, याचा… विधानसभेच्या निवडणुका होऊन फक्त तीन महिने झालेत. आता पुढच्या तीन महिन्यांत पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी, थोरात व खताळ गट अशा दोघांकडूनही जनतेसमोर राहण्याची चढाओढ सुरु झाली आहे. वीज, पाणी हे प्रश्न आधी नव्हते का? असतील तर ते सुटले का नाहीत? संगमेनरची तोडफोड सुरु आहे का? सुरु असेल, तर ती कशासाठी सुरु आहे? या सगळ्या प्रश्नांभोवती संगमनेरचे राजकारण सध्या फिरताना दिसतेय. फक्त प्रश्न असतील, तर ते सुटावेत अशी संगमनेरकरांची साधी अपेक्षा आहे. राजकारण बाजूला ठेवून दोन्ही लोकप्रतिनीधींनी या प्रश्नावर तोडगा काढावा, असं सर्वांनाच वाटतंय. राजकारण काय कधीही होईल हो… पण वीजेअभावी हातून गेलेलं पीक व शेतकऱ्यांचा झालेला तोटा कधीही भरुन निघत नसतो, हे लोकप्रतिनिधींनी लक्षात घ्यावं, एवढीच अपेक्षा….

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe