सुजय विखे खरंच खासदार होतील का ? सुजय विखेंचं ‘पुनर्वसन मिशन’ सुरू ? राज्यसभेकडे डोळा, कर्डिलेंचा शब्द ठरणार ‘गेमचेंजर’!

Published on -

नगर तालुका भाजपच्यावीतने रविवारी महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात नूतन पालकमंत्री व विधान परिषदेचे सभापती यांचाही सन्मान झाला. या कार्यक्रम राजकीय टोलेबाजी व चिमटे रंगले. आमदारांच्या मुद्यांनी अनेकदा खसखस पिकली. महायुतीचे १० आमदार, पालकमंत्री व सभापती हे सगळेच एकाच मंचावर असल्याने कार्यकमात रंगत आली. प्रत्येकाने मनमोकळे भाषण केल्याने, काही वेळेस भुवया उंचावल्या तर काही वेळा हशा पिकला. या कार्यक्रमात तीन मुद्दे चांगलेच गाजले. त्याच सर्वात जास्त चर्चेत आला, तो सुजय विखेंचा माजीचा आजी होण्याचा मुद्दा… या कार्यक्रमात नेमके काय झाले? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट

नगर तालुका भाजपच्या वतीने रविवारी सकाळी पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापती व महायुतीच्या नूतन आमदारांचा सत्कार सोहळा झाला. नगर शहरातील सहकार सभागृहात झालेल्या या सोहळ्याला महायुतीचे जिल्ह्यातील पदाधिकारीही उपस्थित होते. या कार्यक्रमात आ. मोनिका राजळे व आ. शिवाजी कर्डिले यांनी मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली. सर्व आमदारांमध्ये मी एकटीच लाडकी बहिण आहे, असं म्हणत आ. राजळे यांनी मंत्रीपदासाठी इतर आमदारांसमोर मन मोकळे केले. कर्डिलेंनीही मंत्रीपदाची रि ओढली. सध्या सर्वात ज्येष्ठ असल्याने कर्डिलेंना मंत्रीपद हवे, असे त्यांच्या कार्यकर्त्यांचेही म्हणणे होते.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनीही त्यांचे प्रतिस्पर्धी आ. रोहित पवार यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. राम शिंदे हे सभापतीपदाचा प्रोटोकाँल पाळत नसल्याची टिका आ. रोहित पवार यांनी केली होती. तोच धागा पकडत प्रा. राम शिंदे म्हणाले की, आपण पूर्वी प्रोटोकाँल मंत्री होतो. त्यामुळे आपण पक्षाच्या कामकाजात भाग घेऊ शकतो, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. मला कोणती राजकीय परंपरा नाही. परंतु ज्यांना ६० वर्षांची राजकीय परंपरा आहे, त्यांची इज्जत फक्त ६२३ मतांनी वाचली. असं म्हणत राम शिंदे यांनी रोहित पवारांना चांगलंच धूतलं.

राम शिंदे यांची ही धूवा-धुवी होत नाही तोच, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीही जिल्ह्यातील कर्डिलेंचा दरारा पहिल्यांदा आपल्या ओठांवर आणला. कार्यक्रमात विविध पक्षांच्या नेत्यांनी शिवाजी कर्डिले हे जिल्ह्याच्या राजकारणाचे किंगमेकर आहेत, असा उल्लेख केला. त्यानंतर भाषणाला उभ्या राहिलेल्या पालकमंत्री विखे यांनीही कर्डिलेंची दहशत स्पष्ट केली. विखे म्हणाले की, कर्डिले हे कधी कुणाला डोक्यावर घेतील व कधी कुणाला खांद्यावर घेतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे मी ही त्यांच्यापासून नेहमीच सावध असतो, अशी टिपण्णी केली. विखे यांच्या या चिमट्यानंतर सभागृहात एकच हाशा पिकला.

हे सगळे शेले-पागोटे व चिमटे-कोपरखळ्या सुरु असतानाच, सुजय विखे यांनी एक स्टेटमेंट बाँम्ब टाकला. सुजय विखे नेमके काय बोलतील, याची सर्वांनाच उत्सुकता होती. घडलंही तसंच. विखेंनी आपल्या भाषणात थेट कर्डिलेंना साद घातली. ते म्हणाले, जेव्हा मी आजी होतो, तेव्हा हे सगळे माजी होते. सगळेच माजी असल्याने गप्पा मारायला चार-पाच जण मिळत होते. आता मी एकटाच माजी राहिलोय. त्यामुळे मी गप्पा मारायला कुणाकडे जायचे, हा प्रश्न आहे. त्यामुळे या अधिवेशनात आ. कर्डिले यांन माझ्या पुनर्वसनासाठी काहीतरी मोहिम हाती घ्यावी, असं म्हणत सुजय विखेंनी सर्वांनाच भुवया उंचवायला लावल्या.

गेल्या विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात महायुतीने किमया केली. १२ पैकी १० आमदार निवडून आणले. त्यातही एक कॅबिनेट मंत्रीपद, एक पालकमंत्रीपद व एक विधान परिषद अध्यक्षपद जिल्ह्याच्या पदरात पडले. या सगळ्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे सुजय विखे, मात्र माजी खासदार राहिले. आता पुढच्या लोकसभेला अजून चार वर्षे वेळ आहे. मात्र आपल्याला चार वर्षे माजी रहायला आवडणार नाही, असा सुजय विखेंचा बोलण्याचा मुद्दा होता. त्यात येत्या वर्षभराच्या आत राज्यसभेच्या खासदारांची निवड होणार आहे. राज्यसभेवर सध्या कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नावाची चर्चा आहे. त्याच जागेवर सुजय विखेंचाही डोळा असल्याने त्यांच्या भाषणानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या.

सुजय विखे पुढे म्हणाले की, सध्या नगर जिल्ह्यात आ. शिवाजी कर्डिले यांच्या म्हणण्याप्रमाणेच होत आहे. त्यांनी राम शिंदे यांना विधान परिषदेवर पाठवावे, असा ठराव केला होता. त्यानंतर राम शिंदे यांना विधान परिषदेवर घेतले गेले. त्यानंतर कर्डिलेंनी त्यांना नामदार करणयासाठी पुढाकार घेतला. मग राम शिंदे नामदारही झाले. आता शिवाजी कर्डिले यांनी माझ्यासाठी काहीतरी करावे. शिवाय काय करणार ते आत्ताच जाहीर करावे. खुलासा केला तर मग जिल्ह्याची धुरा व्यवस्थितपणे पुढे नेता येईल, असं सुजय विखेंनी आपल्या भाषणात सांगितलं.

विखेंनी हा मानस व्यक्त केल्यानंतर आ. मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप, आ. काशिनाथ दाते, आ. अमोल खताळ, आ. विक्रम पाचपुते, आ. विठ्ठल लंघे यांनीही आपल्या भाषणात सुजय विखेंच्या पुनर्वसनाचा मुद्दा उचलून धरला. आ. कर्डिले यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती या सगळ्याच आमदारांनी केली. त्यानंतर मात्र आ. कर्डिले यांनीही आपल्या ज्येष्ठत्वाने आश्वासन दिले. तुम्ही काळजी करु नका, सभापती राम शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली तुम्हाला राज्यसभेवर पाठवू, असा थेट शब्द त्यांनी विखेंना दिला.

आता या सगळ्या चर्चेत काही प्रश्न समोर येतात. पराभव झाल्याने सुजय विखे खरंच बोर झालेत का? सुजय विखेंना पु्न्हा खासदार करता येईल का? खासदार व्हावं असं सुजय विखेंना आत्ताच का वाटू लागलंय? वगैरे-वगैरे… आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधली तर, जिल्हा भाजपच्या नेत्यांनी राज्य पातळीवर ताकद लावली तर सुजय विखे राज्यसभेवर नक्की खासदार होतील. राज्यातील ३६ जिल्ह्यांचा विचार केला तर महायुतीला नगर जिल्ह्यात सर्वाधिक यश मिळालंय.

मात्र मंत्रीपदात जिल्ह्यावर अन्याय झालाय. शिवाय सुजय विखे हे युवा नेते आहेत. ते हुशार आहेत. त्यामुळे त्यांचं पुनर्वसन करणं, भाजपसाठी पुढच्या ३० वर्षांचं राजकारण सेट करणारं ठरणार आहे. अमोल खताळ, विक्रम पाचपुते, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते हे पहिल्याच टर्मचे आमदार आहेत. त्यांच्यासाठी सुजय विखेंनी नक्कीच कष्ट घेतलेत. त्यामुळे सुजय विखेंना पुन्हा खासदार केलं तर, नगर जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला होऊ शकतं, हे साधं गणित आहे. सध्यातरी कर्डिले-शिंदे हे महायुतीचे नेते सुजय विखेंसाठी एकत्र ताकद लावताहेत, हा महायुतीसाठी सुखद अनुभव असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe