Ahilyanagar News : म्हणतात ना… हौसेला मोल नाही, हे खरेच आहे. हौसेसाठी कोण काय करेल, हे सांगणे कठिणच आहे. हौसेपायी केडगावचे सुपूत्र भानुदास कोतकर यांनी आलिशान हेलिकॉप्टर खरेदी केले. १७ जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थी होती. याच शुभमुहूर्तावर कोतकर कुटूंबियांनी हेलिकॉप्टर खरेदी करुन त्याची विधिवत पूजा केली. नगर शहरातील हे पहिलेच खासगी हेलिकॉप्टर आहे. यापूर्वी राहुरीतील सुपूत्राने खासगी हेलिकॉप्टर खरेदी केले होते. ते जिल्ह्यातील पहिले हेलिकॉप्टर ठरले होते. आता कोतकर कुटूंबियांनी खरेदी केलेले खासगी हेलिकॉप्टर हे दुसरे ठरले आहे.
तसा, कोतकर कुटुंबियांचा हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा संकल्प ११/११/२०११ रोजीचा होता. मात्र त्या दरम्यान कोतकर कुटूंबियांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. म्हणूनच तर २०११ मध्ये हेलिकॉप्टर खरेदी करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. तब्बल एका तपानंतर म्हणजे २०११ सालचे स्वप्र २०२५ च्या नवीन वर्षात प्रत्यक्षात साकारले, कोतकर कुटुंबियांनी नव्या हेलिकॉप्टरची विधिवत पूजा पुणे येथे केली. हे हेलिकॉप्टर अद्ययावत असून, ते ४ ते ६ आसन क्षमतेचे आहे.
आता यापुढे कोतकर कुटूंबियांचा हवाई प्रवास सुरु होणार आहे. भानुदास कोतकर यांचा जन्म सर्वसामान्य कुटूंबात झाला. केडगावचे भुमिपूत्र असलेले कोतकर यांनी राजकिय तसेच हॉटेल व्यावसायातही प्रचंड गगनभरारी घेतली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद त्याचप्रमाणे नगर पंचायत समितीचे सभापतीपदही त्यांनी भूषविले, समितीचे सभापती असताना अत्यंत कमी कालावधीत त्यांनी नियोजनबद्धरित्या नेप्ती उपबाजार समिती उभारली.
विशेष म्हणजे त्यांनी केडगावला राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व स्व. विलासराव देशमुख यांना आणण्याची किमया केली होती. काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पार पाडली. कुठल्याही प्रकारचा राजकिय वारसा पाठिशी नसताना त्यांनी राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांचे थोरले चिरंजीव संदीप कोतकर यांनी महानगरपालिकेचे महापौरपद भूषविले. कोतकर कुटूंबियांनी राजकारणात आपला खास दरारा निर्माण केला. केडगाव म्हणजेच कोतकर, कोतकर म्हणजेच केडगाव अशी आगळीवेगळी ओळख त्यांनी निर्माण केली, नगर शहरासह जिल्ह्यातही भानुदास कोतकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे
जिल्ह्यात बिरबल म्हणून ओळखले जाणारे भाजपचे आ. शिवाजीराव कर्डिले व माजी आमदार अरुणकाका जगताप हे कोतकर यांचे व्याही आहेत. कोतकर कुटुंबियांच्या नातेवाईकांचा राजकारणात मोठा गोतावळा आहे. नगर शहराच्या राजकारणात कोतकर कुटुंबियांची भूमिका नेहमीच निर्णायक व महत्वाची ठरत असते. २०२५ च्या विधानसभा निवडणूक कुरुक्षेत्राच्या लढाईत माजी महापौर संदीप कोतकर यांच्या पत्नी तथा माजी उपमहापौर सुवणाताई कोतकर यांनी अपक्ष म्हणून रणशिंग फुंकले होते.
मात्र ऐनवेळी सुवणाताई कोतकर यांनी विधानसभा लढाईची तलवार म्यान केली. दरम्यान भानुदास कोतकर यांनी त्यांच्या २०११ च्या स्वप्रपूर्तीसाठी हेलिकॉप्टर खरेदी केल्याने राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. हेलिकॉप्टर खरेदी केल्याबद्दल कोतकर कुटुंबियांवर सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी मोबाईलद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला.