अहमदनगरच्या ‘अजय’चा शेतीत विजय ! नोकरीला राम-राम ठोकला, सुरू केली शेती; दुष्काळी पट्ट्यात उत्पादित केलेल्या कलिंगडचीं थेट दुबईच्या बाजारात विक्री

Ajay Patil
Published:

Ahmednagar News : अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात मोठा बदल केला आहे. पारंपारिक पिकांच्या शेतीला बगल देत शेतकऱ्यांनी आता नगदी आणि हंगामी पिकांच्या लागवडीवर अधिक भर दिला आहे. विशेष म्हणजे यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातूनही असाच एक कौतुकास्पद प्रयोग समोर येत आहे. खरं पाहता अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी कायमच नवनवीन प्रयोग करत राहतात.

या प्रयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी आपले वेगळेपण सिद्ध करत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रयोगाची अनेकांना भुरळ देखील पडली आहे. दरम्यान आता जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याच्या मौजे मांडवगण येथील प्रयोगशील शेतकऱ्याने मिश्र शेतीचा प्रयोग केला आहे. अजय गवांदे यांनी हा प्रयोग केला असून सध्या या प्रयोगाचीं पंचक्रोशीत चर्चा आहे.

अजय यांनी आपल्या चार एकर शेतीत कलिंगड, मिरची आणि झेंडू या पिकांची मिश्र शेती सुरू केली आहे. विशेष म्हणजे या मिश्र पीक लागवडीतून अजय यांना चांगली कमाई होत आहे. एवढेच नाही तर त्यांनी उत्पादित केलेले कलिंगड थेट दुबईच्या बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात आले आहे. खरं पाहता मांडवगण व आजूबाजूचा परिसर दुष्काळी पट्टा म्हणून जिल्ह्यात ओळखला जातो. मात्र या पट्ट्यातील शेतकरी बांधव दुष्काळावर मात करत अलीकडे नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आपलं नाव सबंध राज्यात गाजवत आहेत.

अजय यांनी देखील असाच कौतुकास्पद प्रयोग करत दुष्काळावर यशस्वीरित्या मात करून पारंपारिक पीक पद्धतीला बगल दाखवत मिश्र पीक पद्धतीच्या माध्यमातून हंगामी पिकांची शेती यशस्वीरित्या बहरून दाखवली आहे. वास्तविक अजय हे उच्चशिक्षित तरुण आहेत. त्यांनी बीएससी ऍग्री पर्यंतच शिक्षण घेतलं असून काही काळ एका ॲग्री कंपनीमध्ये नोकरी देखील केली आहे. मात्र मातीशी जुळलेली नाळ, अन शेतीवर अगदी कोवळ्या वयापासून जीव जडला असल्याने त्यांनी नोकरीमध्ये राम शोधण्याऐवजी नोकरीला रामराम ठोकत शेतीमध्येच आपली विकासाची वाट चोखंदळली आहे.

नोकरी सोडल्यानंतर पूर्णवेळ शेती अजय यांनी सुरू केली. शैलेश ढवळे नामक कृषी तज्ञांची त्यांना शेतीमध्ये साथ लाभली. ढवळे यांच्या सल्ल्याने अजय यांना शेतीमध्ये मोठा विजय मिळवता आला. गेल्या वर्षी त्यांनी आपल्या दोन एकरात ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली झेंडू, मिरची आणि कलिंगड या पिकांची मिश्र शेती केली. या शेतीतून त्यांना 60 टन कलिंगडचे उत्पादन मिळाले आणि यापैकी तब्बल 50 टन कलिंगड हे दुबईच्या बाजारात विक्रीस गेले. त्यावेळी सात ते आठ रुपये प्रति किलो असा कलिंगडला दर मिळाला होता. गेल्या वर्षी मिळालेल्या यशामुळे गदगद झालेल्या अजयने यंदा तब्बल चार एकरावर मिश्र पीक लागवडीचा प्रयोग केला आहे.

गेल्यावर्षाप्रमाणेच या वर्षी देखील त्यांनी झेंडू, मिरची आणि कलिंगडचे पीक आपल्या चार एकर क्षेत्रात लावले आहेत. अजय यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या चार एकरासाठी त्यांना 80 हजाराचा खर्च आला आहे. विशेष बाब म्हणजे यातून त्यांना तब्बल 17 ते 18 लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचीं आशा आहे. सध्या ते ऑरगॅनिक फार्मिंग करत असून शेतीला जोड व्यवसाय म्हणून 400 गावरान कोंबड्यांचे संगोपन देखील ते करत आहेत. अजय यांच्या मते मिश्र पीक पद्धतीने शेती केल्यास अधिकचा उत्पादन खर्च होतो मात्र उत्पादन चांगले मिळते.

यावर्षी त्यांना एकरी ८० टन इतके कलिंगडचे उत्पादन मिळण्याचे आशा आहे. तसेच झेंडू आणि मिरचीचे देखील त्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे. निश्चितच, अजय यांनी केलेला शेतीमधला हा प्रयोग सध्या अहमदनगर जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे. अजय यांचा हा प्रयोग इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असून भविष्यात त्यांच्याप्रमाणे इतरही शेतकरी मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करतील आणि आपल्या आयुष्यात आर्थिक स्थैर्यता आणतील असा आशावाद देखील व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe