Ahmednagar News : राज्याच्या आर्थिक विकासासाठी गेम चेंजर ठरणारां समृद्धी महामार्गाचा जवळपास 80 टक्के भाग आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मुंबई-नागपूर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे अर्थातच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग राज्याच्या 15 जिल्ह्यांसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या महत्त्वाचा आहे.
या महामार्गामुळे विदर्भातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील वंचित भाग देखील यामुळे समृद्ध बनण्याची आशा आहे. या मार्गमुळे विदर्भाची कनेक्टिव्हिटी राजधानीशी सुलभ होणार आहे. हेच कारण आहे की हा महामार्ग लवकरात लवकर सामान्य जनतेसाठी खुला करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत.

डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे अर्थातच नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे नागपूर ते शिर्डीचा प्रवास अगदी जलद आणि सुसाट झाला आहे. यामुळे या मार्गाचे उर्वरित टप्पे देखील लवकरात लवकर पूर्ण व्हावेत आणि नागपूर ते मुंबईचा प्रवास सोयीचा व्हावा अशी प्रवाशांची इच्छा होती.
दरम्यान या महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटरचा टप्पा काल अर्थातच 26 मे 2023 रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री महोदय यांनी या महामार्गाबाबत एक महत्त्वाची अपडेट देखील दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उद्घाटनाप्रसंगी संपूर्ण समृद्धी महामार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल अशी घोषणा केली आहे. अर्थातच, यावर्षाअखेर नागपूर ते मुंबई हा संपूर्ण प्रवास समृद्धी महामार्गाने करता येणे शक्य बनणार आहे. यामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास मात्र आठ तासात पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
तूर्तास नागपूर ते भरवीर पर्यंतचा प्रवास समृद्धी महामार्गाने करता येणार असून यामुळे या भागातील वाहतूकीला चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे नाशिककरांचा शिर्डीकडील, नागपूरकडील प्रवास सोयीचा होणार आहे.
शिर्डीलाही मिळणार मोठी भेट!
शिर्डी ते भरवीर या 80 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल 26 मे 2023 रोजी कोकमठाण (ता. कोपरगाव) येथील महामार्गावरील शिर्डी इंटरचेंज येथे पार पडले. या कार्यक्रमास ज्यांच्या संकल्पनेतून समृद्धी महामार्ग उभा राहिला असे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते.
महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, खासदार हेमंत गोडसे, राज्याचे मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री महोदय यांनी शिर्डी, अहमदनगरकरांसाठी एक मोठी घोषणा देखील केली.
शिर्डी विमानतळाच्या विस्तारीत टर्मिनल इमारतीच्या कामाचे भूमिपूजन जुलैच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री महोदय यांनी या उद्घाटनाप्रसंगी केली. यासोबतच, नागपूर ते गोंदिया असा एक महामार्ग प्रकल्प देखील तयार होणार असल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.