Ahmednagar News : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. मात्र शेतीमध्ये अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही ही ओरड अलीकडे प्रत्येकचं शेतकरी करत आहे. निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी बांधवांना शेती व्यवसायात अपेक्षित अशी प्रगती साधता येत नसल्याचे भयान वास्तव अनेकदा समोर आले आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करत शेतकरी बांधव बहू कष्टाने शेतमाल उत्पादित करतो मात्र अनेकदा बाजारात अपेक्षित असा दर मिळत नाही.
परिणामी शेती व्यवसाय तोट्याचा सिद्ध होतो. शासनाचे कुचकामी धोरण, उद्योगाची लॉबी, व्यापाऱ्यांचे धुर्त रणनीती यामुळे बाजारात शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नाही. अशा परिस्थितीत तरुणाई आता शेती नको रे बाबा असा ओरड करत आहे. निश्चितच हे भयान वास्तव नाकारता येणार नाही. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील एका सेवानिवृत्त जवानाने शेती आणि शेतीपूरक व्यवसायात अफलातून अशी कामगिरी केली असून जय जवान जय किसान ही घोषणा सत्यात उतरली आहे.
नगर तालुक्यातील मौजे चास येथील सुभाष लिंबाजी गोंडाळ यां सेवानिवृत्त जवानाने पाच वर्षांपूर्वी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला असून आजच्या घडीला त्यातून महिन्याकाठी पाच ते सहा लाखांची कमाई करत आहेत. त्यामुळे सध्या या सेवानिवृत्त जवानाचा हा प्रयोग पंचक्रोशीत चर्चिला जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सुभाष यांनी सतरा वर्ष भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. भारतीय सैन्यात असताना त्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. खरं पाहता राजधानी दिल्ली येथे संसद भवनावर अतिरेक्यांनी हल्ला चढवला होता.
त्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर तणाव होता. भारतीय सैन्याकडून ऑपरेशन पराक्रम पुढील एक वर्ष चालवण्यात आले होते. या ऑपरेशन पराक्रम मध्ये देखील त्यांनी मोलाची भूमिका निभावली आहे. आपल्या सेवाकाळात त्यांनी अनेक अतिरेक्यांना मराठमोळा हिसका दाखवत यमलोकी पाठवण्याचे काम केले आहे. दरम्यान ते पाच वर्षांपूर्वी आपल्या सतरा वर्षांची यशस्वी सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी घरी बसून राहण्यापेक्षा शेती करण्याचा निर्णय घेतला.
वास्तविक सेवानिवृत्तीनंतर आपण शेती आणि शेतीपूरक व्यवसायात करायचा हे त्यांनी 11 वर्षांपूर्वी ठरवलं होतं. या अनुषंगाने त्यांनी भोयरे पठार या ठिकाणी एक एकर शेत जमीन विकत घेऊन ठेवली होती. अशा परिस्थितीत सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांनी आपला मित्र भास्कर भोर यांच्यासोबत कुक्कुटपालन व्यवसायाबाबत सविस्तर अशी चर्चा केली आणि कंपनीसोबत करार पद्धतीने हा व्यवसाय सुरू केला. 2017 मध्ये या व्यवसायाची पायाभरणी झाली. तब्बल 39 लाख रुपये खर्च करून 20,000 पक्षांचीं क्षमता असलेले दोन पोल्ट्री हाऊस उभारण्यात आले.
तीन वर्ष हा व्यवसाय सुरळीत झाल्यानंतर या व्यवसायाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नुकतेच दोन वर्षांपूर्वी यां अनुषंगाने अजून चार एकर शेत जमीन विकत घेण्यात आली असून यामध्ये 13000 पक्षी क्षमतेचे दोन पोल्ट्री फार्म उभारण्यात आले आहेत. यासाठी मात्र 56 लाख रुपयांचा खर्च त्यांनी केला असून कुकूटपालन व्यवसायातून उभारलेली रक्कम आणि बँकेकडून कर्ज घेण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते या व्यवसायातून पाच ते साडेपाच लाखांची कमाई करत आहेत.
निश्चितच एका सेवानिवृत्त जवानाने शेतीपूरक व्यवसायात केलेला हा चमत्कार इतरांसाठी मार्गदर्शक असा राहणार आहे. यासोबतच ते सेंद्रिय पद्धतीने शेती देखील करत आहेत. निश्चितच सर्वप्रथम सीमेवर देशाचे संरक्षण करत आणि नंतर शेतीमध्ये नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत या सेवानिवृत्त जवानाने जय जवान जय किसान ही घोषणा बुलंद केली आहे. त्यांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी निश्चितच चांगल्या चांगल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना विचारात पाडणारी असून त्यांचा आदर्श अशा प्रयोगशील शेतकऱ्यांपुढे राहणार आहे.